शासनाकडून तातडीचा अध्यादेश, शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन दिली माहिती !
छत्रपती संभाजीनगर – कुणबी नोंदी पडताळण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या शिंदे समितीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ही समिती आतापर्यंत मराठवाडा येथीलच नोंदी पडताळत होती; मात्र आता ही समिती राज्यातील कुणबी नोंदींची पडताळणी करणार आहे.
अंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे काल राज्य सरकारचे शिष्टमंडळ व न्या.शिंदे समिती यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीतील टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने दोन महिन्यांच्या कालावधीची मागणी व विनंती केल्यानंतर pic.twitter.com/ykwR8u2KKa
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 3, 2023
या संदर्भात शासनाने तातडीने अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश लागू होताच सरकारच्या शिष्टमंडळाने ३ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात जाऊन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, तसेच त्यांना अध्यादेश दाखवला. या वेळी मनोज जरांगे यांनी हा अध्यादेश काळजीपूर्वक वाचला. ‘समिती आता राज्यभरात काम करणार. त्यामुळे राज्यभरातील मराठा बांधवांना कुणबी दाखले मिळणार, याचा आनंद आहे’, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि मंत्री अतुल सावे यांनी ही भेट घेतली. ‘या अध्यादेशामुळे समाधान झाले का ?’, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण मिळाल्याविना आमचे समाधान कसे होईल; मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे समिती आता राज्यभर काम करणार याचा अतिशय आनंद आहे; कारण आम्ही आंदोलन चालू केल्यानंतर शिंदे समितीचा जो पहिला अहवाल आला, तेव्हा फक्त मराठवाड्याशी संबंधितच हा अहवाल होता; मात्र आता ही समिती राज्यभरातील कुणबी नोंदींची पडताळणी करणार आहे. त्यामुळे राज्यभरात जे कुणी गरजवंत मराठे आहेत, त्यांनाही आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. समितीचा दर्जा वाढवला आहे. त्यामुळे ही समिती आता जोमाने कामाला लागेल.