वाराणसी (उत्तरप्रदेश) – भारतातील प्रथितयश आयआयटी विश्वविद्यालयांत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. येथील ‘आयआयटी बनारस’ विश्वविद्यालयात १ नोव्हेंबरच्या रात्री अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या ३ वासनांधांनी विद्यार्थिनी आणि तिच्या मित्राला बंदुकीच्या जोरावर वेगळे केले. त्यानंतर विद्यार्थिनीला तिचे कपडे काढण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओही बनवला. या घटनेच्या २ दिवस आधी म्हणजे ३० ऑक्टोबर या दिवशीही विश्वविद्यालयाच्या त्याच जागेवर अन्य एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे.
१. १ नोव्हेंबरची घटना समोर आल्यानंतर २ नोव्हेंबरला २ सहस्र ५०० विद्यार्थ्यांनी विश्वविद्यालय परिसरात निदर्शने केली होती. ३० ऑक्टोबरच्या घटनेत मात्र अपकीर्तीच्या भीतीने पीडिता शांत राहिली आणि तिने कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही.
२. यासंदर्भात विश्वविद्यालयातील विद्यार्थी संसद सदस्य प्रणव म्हणाले की, ३० ऑक्टोबरच्या घटनेशी संबंधित काही मुलांची ओळख पटली आहे.
३. भेलूपूरचे पोलीस उपायुक्त प्रवीण सिंह म्हणाले की, अनेक संशयितांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. ‘आरोपी सावध होऊ नये’, त्यामुळे आम्ही सध्या कुणाचीही ओळख उघड करू शकत नाही. विश्वविद्यालयाच्या परिसराच्या सुरक्षेसाठी २ पोलीस उपनिरीक्षक (१ पुरुष आणि १ महिला) आणि ५ शिपाई तैनात केले जातील.
४. विश्वविद्यालयाचे अधिकारी प्रा. विकास दुबे म्हणाले की, बंद ‘कॅम्पस’ची मागणी पूर्ण करण्यासाठी कार्यवाही चालू करण्यात आली आहे. ‘बीएच्यू’ आणि ‘आयआयटी’ यांच्या परिसरांमध्ये सीमा भिंत बांधण्यात येईल. त्याचसमवेत ज्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्या, तेथे रात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे.
५. या सीमाभिंतीला २ सहस्र ५०० आयआयटी विद्यार्थ्यांनी समर्थन दर्शवले असले, तरी ‘बीएच्यू’च्या २० सहस्र विद्यार्थ्यांनी यास विरोध दर्शवला आहे. यासाठी दोन्ही विद्यालयांतील विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
संपादकीय भूमिका‘आयआयटी’सारख्या प्रथितयश विश्वविद्यालयांत अशा घटना घडल्याने भारताचे नाव मलीन होत आहे. संबंधित वासनांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |