नोएडातील वायूचा गुणवत्ता निर्देशांक ५५६ पर्यंत पोचला !
नवी देहली – देहली आणि शेजारील राष्ट्रीय राजधानी क्षेत्रांतील वायूप्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ४ नोव्हेंबर या दिवशी देहलीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५०४, नोएडाचा ५७६ आणि गुरुग्रामचा ५१२ इतका होता. सामान्यतः हा निर्देशांक १०० पर्यंत सामान्य मानला जाते. याचाच अर्थ देहलीतील आणि त्याच्या शेजारील भागातील वायूचे प्रदूषण ५ पटींनी वाढले आहे. याविषयी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयाचे डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितले की, ४०० ते ५०० वायू गुणवत्तेचा निर्देशाक २५ ते ३० सिगारेट पेटवल्यावर निर्माण होणार्या धुराप्रमाणे आहे. याचा परिणाम लोकांच्या शरिरावर होत आहे. गर्भवती महिलांच्या गर्भासाठी ही हवा धोकादायक आहे.
सौजन्य एकॉनॉमिक टाइम्स
देहली सरकारची केंद्र सरकारकडे ५ राज्यांसमेवत आपत्कालीन बैठक आयोजित करण्याची मागणी
देहलीतील वाढत्या प्रदूषणावर केंद्र सरकारने तातडीने आपत्कालीन बैठक आयोजित करावी, अशी मागणी देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी केली आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, देहली आणि राजस्थान या राज्यांसमवेत ही बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाढत्या प्रदूषणावरून राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषित राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस बजवून उत्तर मागितले आहे. या संदर्भात तात्काळ कृती करण्यास अन् त्याचा अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे.
देहलीतील वायू प्रदूषणाला वन विभाग उत्तरदायी !देहली उच्च न्यायालयाने वन विभागाला फटकारले ! वृक्ष तोडणीच्या एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी देहली उच्च न्यायालयाने देहली राज्याच्या वन विभागाला फटकारले. न्यायालयाने म्हटले की, तुम्हाला वाटते की, देहलीतील लोकांनी ‘गॅस चेंबर’मध्ये रहावे. आम्ही तुम्हाला संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्हाला ते लक्षातच येत नाही. तुम्ही स्वतःला या प्रकरणातून बाजूला करू पहाणे हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे. देहलीतील लोक आज ज्या स्थितीत आहेत, त्याला तुम्ही उत्तरदायी आहात. एप्रिल २०२२ मध्ये देहली वन विभागाने मोठ्या प्रमाणात विविध कारणांतर्गत राज्यातील वृक्ष कापण्याचा आदेश दिला होता. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते भवरीन कंधारी यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वन विभागाला वरील प्रकारे फटकारले. |
संपादकीय भूमिकाराजधानी देहलीत प्रतिवर्षी या काळात वायू प्रदूषणात वाढ होते, हे सर्वपक्षियांना ठाऊक असूनही ते प्रदूषण दूर करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करत नाहीत आणि जनताही त्यांना याविषयी जाब विचारत नाही, ही स्थिती लज्जास्पद आहे ! |