मला औषधे कधी थांबवता येतील ?

‘एखादे युद्ध झाले आणि आपण ते जिंकले की, त्यानंतर पुढे काहीच काम रहात नाही का ? किंवा एखादे वादळ येऊन गेले की, जरी ते थोडाच वेळ असले, तरी त्याने केलेली नासधूस भरून काढायला नंतर वेळ जात नाही का ? त्याचप्रमाणे एखादी व्याधी होऊन गेल्यावरही त्याने शरिरात केलेली नासधूस भरून काढणे आणि शरिराला पूर्ववत् करणे, हेही आवश्यक असते.

वैद्य परीक्षित शेवडे

आयुर्वेद याला ‘अपुनर्भव’ किंवा ‘रसायन’ असे म्हणतो. व्याधीला प्रतिकार करणे, ही शरिराची नैसर्गिक प्रवृत्ती असते. यात आपल्या शरिरातील दोष, धातू, मल यांचे साहाय्य घेतले जाते. धातूंनी शरीर धारण केले असल्याने त्यांना पोचणारी हानी ही अधिक असते आणि ती भरून येण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तो न दिल्यास त्या व्याधीचे अवशेष पुन्हा डोके वर काढतात आणि कित्येकदा पुन्हा तीच व्याधी किंवा तिचा उपद्रव म्हणून अन्य त्रास निर्माण करतात. व्यवहारात आपण ज्याला ‘ताप उलटणे’, असे म्हणतो, त्यालाच आयुर्वेदाने ‘पुनरावर्तक ज्वर’, अशी संज्ञा वापरली आहे. कित्येक तापाच्या प्रकारांमध्ये नंतर काहीकाळ सांधेदुखी रहाते, हे आपण प्रत्यक्ष पहातो. आयुर्वेद यावर उत्तम लाभ देतो; कारण ती निर्माण होण्याचा मार्ग त्याला ठाऊक आहे. म्हणूनच आयुर्वेदात ताप उतरला की, ‘औषधे थांबली’, असे होत नाही. त्यापुढे किमान एक आठवडाभर तरी आपले वैद्य देतील, ती औषधे घेणे हितावह असते. ‘ताप गेला, तरी कसली औषधे देतात ? कशाला फुकटचे पैसे भरत राहू ?’, असा विचार अनेकांच्या मनात स्वाभाविकपणे येऊ शकतो. म्हणूनच ही पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे.

‘पूर्ण बरे वाटते डॉक्टर. तरी औषध आणखी किती काळ घ्याव लागेल ?’, या प्रश्नाचे उत्तर इथे दडले आहे. आपल्या धातूंना दुरुस्त केल्याची वैद्यांची खात्री पटली की, औषध थांबणार हे नक्की. तोवर धीर ठेवणे, हे आपल्या हिताचे ! दुर्दैवाने कर्करोगासारख्या व्याधीत; जिथे हा विचार प्राधान्याने करायला हवा, तो केला जात नाही. सेकंडरी कर्करोगाविषयी आजही आपण सजग नाही. ‘आता कोणतीही औषधे नको’, असा शिक्का कुणीतरी मारून दिला की, आम्हाला आनंद होतो; पण पुढे काय वाढून ठेवले असू शकते, याचा विचार होत नाही. तिथेही आयुर्वेदाची ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरतांना दिसते. आजाराचे बीज समूळ नष्ट करणे आणि त्या आजाराने शरिराची केलेली हानी भरून काढणे, याचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल, तर आयुर्वेदोक्त ‘अपुनर्भव’ आणि ‘रसायन’ चिकित्सेला पर्याय नाही. ‘औषधे कधी थांबवता येतील ?’, या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल, अशी अपेक्षा !’

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१२.८.२०२३)