सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा असणार्या फोंडा, गोवा येथील श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर यांच्याविषयी त्यांची मुलगी सौ. सीमा सामंत यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत
१. कष्टमय जीवन
‘माझ्या आईचे (श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर यांचे) लग्न झाले, तेव्हा माझे वडील ((कै.) दामोदर वालावलकर) भांड्यांच्या दुकानात कामाला होते. तिथे त्यांना अगदी अल्प पगार होता. त्यांचे मोठे कुटुंब होते. आईला अल्प पैशांत घर चालवावे लागत असे. काही वेळा जेवण बनवायलाही घरात धान्य नसे. त्यातच ती तिच्या ३ भाच्यांचा सांभाळ करत असे. तिने त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम देऊन लहानाचे मोठे केले.
२. अनासक्त
आईला कशाचीच आसक्ती नाही. तिला कुणी कधी भेट म्हणून पैसे दिले, तर ती ते पैसे इतरांना देऊन टाकते. ती आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तू स्वतःजवळ ठेवत नाही.
३. काटकसरी
आई तिच्याकडील सर्व वस्तू सांभाळून वापरते. तिला उगाचच पैशाचा व्यय केलेला आवडत नाही. ती नेहमी म्हणते, ‘‘आपल्याला देवाने दिलेला पैसा जपूनच वापरायला हवा.’’
४. साधक घरी आल्यावर तिला आनंद होत असे. मी सेवेला गेल्यावर ती घरात एकटी थांबून मला सेवेत साहाय्य करत असे.
५. ती आध्यात्मिक स्तरावरील सर्व उपाय आवडीने आणि श्रद्धेने करत असे.
६. आईचे वय ८५ वर्षे आहे. वयोमानानुसार तिला काहीही शारीरिक त्रास झाला, तर ती ‘प.पू. डॉक्टर’, असा जप करते.
७. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे गंभीर आजाराला स्थिर राहून सामोरे जाणे
वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेपासून आई रुग्णाईत झाली. तिला शौचाचा त्रास चालू झाला. तिच्या शौचातून रक्त पडू लागले आणि तिला अशक्तपणा आला. आजाराचे निदान करण्यासाठी आधुनिक वैद्यांनी अनेक चाचण्या केल्या. काही कारणामुळे एकच चाचणी पुनःपुन्हा करावी लागली; पण त्रास होत असतांनाही गुरुदेवांच्या कृपेमुळे आई स्थिर आणि शांत होती. सर्व चाचण्यांतून लक्षात आले की, तिच्या गुदद्वाराजवळ गाठ आहे आणि तिचे शस्त्रकर्म करावे लागेल. शस्त्रकर्माच्या वेळी गुरुदेवांच्या कृपेने आईला कोणताच त्रास झाला नाही. गाठ तपासायला पाठवल्यावर तिचा वैद्यकीय अहवाल सर्वसाधारण आला. मुळातच घाबरट स्वभाव असूनही गुरुदेवांवरील श्रद्धा आणि त्यांची अपार कृपा यांमुळे आई या आजारपणाला स्थिर अन् शांत राहून सामोरी जाऊ शकली.’
– सौ. सीमा सामंत (श्रीमती दमयंती वालावलकर यांची मुलगी), फाेंडा, गोवा. (ऑक्टोबर २०२३)
श्रीमती दमयंती वालावलकर यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती !
१. ‘श्रीमती दमयंती वालावलकर यांच्या अकस्मात् भेटीमागे दैवी नियोजन आहे’, याविषयी साधकाला आलेली अनुभूती !
‘१.१०.२०२३ पासून मी सकाळी फिरण्याचा व्यायाम चालू केला. मी प्रतिदिन नागेशीमार्गे फिरून परत रामनाथी आश्रमात येत असे. २९.१०.२०२३ या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘उद्यापासून आपण फोंड्याला जाण्याच्या मार्गाने फिरण्यास जाऊ.’ दुसर्या दिवशी सकाळी मी फोंड्याला जाण्याच्या मार्गाने फिरण्यास गेलो. फिरतांना माझी एका साधिकेशी भेट झाली. तिने मला तिच्या घरी बोलावले. त्या साधिकेच्या घरासमोर रहाणार्या गोवा येथील साधिका सौ. सीमा सामंत यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. तेव्हा माझी त्यांच्या मातोश्री श्रीमती दमयंती वालावलकर (वय ८५ वर्षे) यांच्याशी भेट झाली. तेव्हा मला आजींच्या चेहर्यावर पुष्कळ चैतन्य जाणवले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘हे दैवी नियोजन आहे. देवाला माझी आजींशी भेट घडवून आणायची होती; म्हणून आज मला या मार्गाने फिरायला जाण्याची बुद्धी झाली.’
२. सौ. सीमा सामंत यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती दमयंती वालावलकर यांच्याविषयी सांगितलेली माहिती
सौ. सामंत मला म्हणाल्या, ‘‘आजींचे वय ८५ वर्षे आहे. त्यांनी २२.१०.२०२३ पासून अन्नाचा त्याग केला आहे, तसेच तेव्हापासून त्या काही बोलत नाहीत. त्यांना काही द्रवपदार्थ दिल्यास त्या ग्रहण करतात. आजींचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासाठी पुष्कळ केले आहे’, असा त्यांचा कृतज्ञताभाव असतो. आजी दत्त आणि कुलदेवी यांचा नामजप करतात.’’
३. श्रीमती वालावलकर यांच्याकडे पाहून जाणवलेली सूत्रे
अ. आजींच्या चेहर्याकडे पाहून मला पुष्कळ चैतन्य जाणवले.
आ. त्यांचे मन शांत आणि स्थिर आहे.
इ. त्या शिष्यभावात आहेत.
ई. त्यांच्या डोळ्यांकडे पाहून माझ्या मनात विचार आला, ‘त्या स्वतःकडे साक्षीभावाने पहात आहेत.’
उ. ‘त्यांचा जीवनातील सर्व कार्यभाग पूर्ण झाला असून आता त्या निश्चिंत आहेत’, असे मला जाणवले.
ऊ. ‘आजींची आध्यात्मिक पातळी उच्च आहे’, असा विचार माझ्या मनात आला.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२३)
श्रीमती दमयंती वालावलकर यांच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार !‘श्रीमती दमयंती वालावलकर यांचे छायाचित्र पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘आजींची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के आहे. त्या पुढे संत होतील.’’ – श्री. राम होनप (३.११.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |