‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून त्यांच्या साधनेतील शंकाचे निरसन केले, त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे विचारांमध्ये सकारात्मक पालट झाल्याचे साधिकेने सांगणे

कु. मयुरी आगावणे : पूर्वी माझ्या मनात काही विकल्प आणि प्रतिक्रिया येत होत्या. माझ्या मनात विचारांचे प्रमाण पुष्कळ अधिक असल्यामुळे ते माझ्या लक्षातच येत नव्हते; परंतु आता स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेमुळे ते माझ्या लक्षात येत आहे. आता ‘यावर मला प्रयत्न करायचे आहेत’, असे विचार माझ्या मनात येतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : फारच छान !

कु. मयुरी आगावणे

कु. मयुरी आगावणे : पूर्वी माझ्यात नकारात्मकता अधिक प्रमाणात होती आणि माझे त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न होत नव्हते; परंतु आता तेजलताई (सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के  (संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय)) मला आणि संगीत विभागातील सर्वांनाच चांगले मार्गदर्शन करते. सौ. सुप्रियाताईंमुळेही (व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधिका सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांच्यामुळेही) मला साहाय्य होत आहे. माझ्यातील सकारात्मकता वाढली आहे आणि ती मला अनुभवता येत आहे.

२. सांगितल्याप्रमाणे केल्याने मनोलय आणि बुद्धीलय होतो !

कु. मयुरी आगावणे : मला मानसिक विचारांचा थोडा त्रास आहे. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेमुळे माझ्या मनात विचार आले, ‘या विचारांत न अडकता गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) जे सांगितले आहे, ते करायचे आहे. मला जे प्रयत्न करायला सांगितले आहेत, ते करायचे आहेत आणि दुसरेही प्रयत्न करायला सांगितले आहेत, तेही करायचे आहेत.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘जे सांगितले आहे, ते करायचे आहे’, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपली बुद्धी आणि मन नष्ट होते. यालाच आपण ‘मनोलय आणि बुद्धीलय’ म्हणतो ना ! केवळ भगवंताचे मन आणि बुद्धी, म्हणजे भगवंताचे विचार आपल्याला ग्रहण होऊ लागतात.