देेशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी होणार अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !

अयोध्या – येथे होणार्‍या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मंदिराचा समावेश असेल. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हिंदु समुदायांना एकमेकांच्या जवळ आणणे आणि जातीय विचारसरणी संपवण्याचा प्रयत्न करणे, हे विश्‍व हिंदु परिषदेचे उद्दिष्ट आहे.

यापूर्वी विहिंपने श्रीराम पादुका पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला देशातील प्रत्येक समाज आणि विविध जातींतील लोक यांना जोडले होते. तसेच काही काळापूर्वी श्रीराम मंदिर उभारणीसाठी समर्पण निधी अभियान चालू करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी हिंदु कुटुंबे एकत्र आली. जेव्हा जेव्हा भगवान श्रीरामाचा विषय येतो तेव्हा संपूर्ण देश जातीभेद विसरून एकत्र येतो, असे विहिंपचे डॉ. सुरेंद्र जैन यांनी सांगितले.