‘बिग बॉस ओटीटी’ कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव याच्यावर सापांच्या तस्करीचा गुन्हा नोंद !

  • ‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये साप आणि त्यांच्या विषाचा केला जात होता वापर !

  • ५ तस्करांना अटक

  • ९ साप आणि २० मि.ली. विष जप्त

एल्विश यादव

नोएडा (उत्तरप्रदेश) – ‘बिग बॉस ओटीटी-२’चा विजेता आणि यू-ट्यूबवर व्हिडिओ बनवणारा एल्विश यादव याच्यावर सापांच्या तस्करी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी वन्यजीव संरक्षणाशी संबंधित एका प्रकरणात गुन्हा नोंदवला असून एल्विश याच्यावर ‘रेव्ह पार्टी’ आयोजित केल्याचा आरोप आहे. या पार्टीत सापांचा वापर करण्यात आला होता. ‘पीटा’ या प्राणीमित्र संस्थेने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून (गुप्तपणे केलेले चित्रीकरण) ही गोष्ट समोर आली आहे. (जर या संस्थेने स्टिंग ऑपरेशन केले नसते, तर ही घटना समोर आली नसती. याचा अर्थ सर्व यंत्रणा हाताशी असणारे पोलीस झोपलेले आहेत, हेच स्पष्ट होते ! अशी अनेक प्रकरणे असतील, जी पोलिसांना ठाऊक नाहीत आणि चालू आहेत ! कदाचित् पोलीस लाच घेऊन अशा प्रकरणांकडे दुर्लक्षही करत असतील ! – संपादक) या प्रकरणी पोलिसांत वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. यावरून ५ तस्करांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ९ साप जप्त करण्यात आले आहेत. ज्यात ५ कोब्रा, १ अजगर, दोन डोकी असलेला १ साप (सँड बोआ) आणि १ उंदीर साप (घोड्याच्या पाठीचा साप) यांचा समावेश आहे. याखेरीज या तस्करांकडे २० मि.ली. सापाचे विष सापडले आहे. राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत.

अटक करण्यात आलेले तस्कर

१. वन अधिकारी प्रमोद श्रीवास्तव यांनी सांगितले की, रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो. ही ‘यूट्यूबर्स’ची (यू ट्यूबसाठी व्हिडिओ बनवणार्‍यांची) टोळी आहे, जी अशा पार्ट्या आयोजित करते.

२. या टोळीचा मुख्य आरोपी एल्विश यादव हा पसार आहे. त्याने एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना तो निरपराध असल्याचा दावा केला आहे. अटक केलेल्या आरोपींना ओळखत नसल्याचाही दावा त्याने केला आहे. एल्विश यादव एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. तो यूट्यूब चॅनलवर विनोदी व्हिडिओ बनवतो. त्याच्या यूट्यूब चॅनेलचे अनुमाने १४ लाख २० सहस्र सदस्य आहेत.