सर्वांशी जवळीक असणारे आणि सनातनच्या साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे) !

पूर्वी ‘डॉक्टर म्हणजे देव’, असे समजत असत. त्या काळी काही प्रमाणात सात्त्विकता असल्याने वैद्य साधना करणारे असत. पुढे कौटुंबिक वैद्य (फॅमिली डॉक्टर) ही संकल्पना रूढ झाली. यामध्ये डॉक्टर एका कुटुंबातील सदस्याप्रमाणेच असायचा. रुग्णाला पहाताक्षणी त्याला कोणते औषध द्यायला हवे किंवा याच्यावर कसे उपचार करायला हवेत ? हे वैद्यांना समजत असे. असेच एक वैद्य रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आहेत आणि ते म्हणजे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठेकाका ! मराठेकाका साधना करणारे असल्याने अनेकांना त्यांचा आधार वाटतो. या लेखमालेत आपण ‘मराठेकाकांनी केलेली साधना, तसेच सर्वांशी जवळीक साधणार्‍या, सतत हसतमुख, प्रसन्न, उत्साही आणि आनंदी असणार्‍या मराठेकाकांविषयी साधकांना काय वाटते ?’, हे जाणून घेऊया. ३१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी आपण काही साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/733473.html


आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

२. गुणवैशिष्ट्ये

२ आ ३ ई. श्री. दिलीप नलावडे, फोंडा, गोवा.

१. साधकांचे पैसे वाचवून चांगले उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करणे

‘साधकांवर आश्रमात होऊ न शकणार्‍या पुढील उपचारांसाठी आधुनिक वैद्य मराठेकाका साधकांना सरकारी रुग्णालयात पाठवतात. त्यामागे ‘साधकांचा अनावश्यक व्यय व्हायला नको’, असा त्यांचा विचार असतो. उपचारांचा व्यय अल्प होऊन चांगले उपचार मिळण्यासाठी ते साधकांना चांगले मार्गदर्शन करतात.

२. साधकांना तज्ञ आधुनिक वैद्यांकडून उपचार, रक्त चाचण्या आणि औषधे सवलतीच्या दरात मिळण्यास साहाय्य करणे

काकांचे फोंडा शहरातील वेगवेगळ्या आजारांवरील तज्ञ आधुनिक वैद्य ओळखीचे आहेत. काका रुग्ण साधकांना पत्र देतात किंवा तज्ञ आधुनिक वैद्यांशी भ्रमणभाषवर बोलून साधकांना त्यांच्याकडे उपचारांसाठी पाठवतात. तेव्हाही ते साधकांचे हितच बघतात. ‘साधकांना सवलतीच्या मूल्यात सर्व उपलब्ध व्हावे’, यासाठी काकांनी शहरात रक्त तपासणीच्या प्रयोगशाळा, औषधालये (मेडिकल स्टोअर्स) अशा ठिकाणी चांगले संपर्क ठेवले आहेत.

३. साधकांच्या प्रकृतीची सर्वतोपरी काळजी घेणे

अ. एकदा मला अकस्मात् सर्वांगाला घाम येऊन अंग थरथरत होते. तेव्हा काकांनी माझा रक्तदाब तपासून हृदय स्पंदन आलेख (‘ई.सी.जी’) काढला. त्यांनी मला बांबोळी येथील रुग्णालयात पाठवून ‘२४ ते ४८ घंटे घ्यायचा हृदय स्पंदन आलेख’ (‘व्होल्टर टेस्ट’ Volter Test) केली. ती चाचणी सामान्य आली. अशा प्रकारे ते मूळ आजार शोधण्याचा प्रयत्न करतात.

आ. कोरोनाच्या काळात माझ्या पत्नीचे पोटाचे मोठे शस्त्रकर्म झाले. तेव्हा काकांनी चांगले तज्ञ आधुनिक वैद्य शोधून, त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलून आम्हाला मार्गदर्शन करून धीर दिला. नातेवाईकही काळजी घेणार नाहीत, एवढी काकांनी काळजी घेतली.

‘या सेवेत काकांचा मोठा त्याग आहे’, असे मला वाटते. काही प्रसंगांवरून ‘काका स्वतःच्या प्रकृतीपेक्षा साधकांच्या प्रकृतीची अधिक काळजी घेतात’, असे माझ्या लक्षात आले आहे.

‘गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्हीच मला आधुनिक वैद्य मराठे यांचे गुण लक्षात आणून दिलेत’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता.’ (९.३.२०२३)

२ आ ३ उ. श्री. अरुण कुलकर्णी, बांदोडा, गोवा.

१. ‘आधुनिक वैद्य मराठेकाका प्रत्येक रुग्ण साधकाचा वैद्यकीय इतिहास (Medical history) लक्षात घेऊन त्याला सर्वतोपरी साहाय्य करत असणे

‘एकदा मला ‘पायात रक्ताच्या गुठळ्या होणे’ (डी.व्ही.टी., Deep Vein Thrombosis) हा आजार झाला होता. तेव्हा आधुनिक वैद्य मराठेकाका मला वेळोवेळी होण्यार्‍या रक्ताच्या चाचणीच्या अहवालानुसार ‘औषध कसे घ्यायचे ?’, हे नीट समजावून सांगायचे. त्यांनी माझ्या प्रकृतीचा अभ्यास करून मला सर्व वैद्यकीय चाचण्यांची नोंद ठेवण्यास सांगितले. मागील वर्षी मला त्याच पायाला पुन्हा त्याच आजाराची थोडी लक्षणे दिसू लागली. तेव्हा काकांनी मला त्यांच्या चारचाकी गाडीतून बांबोळी येथील रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यास सांगितले आणि पुढील मार्गदर्शन केले. त्यांनी माझ्यावर केलेले उपचार आणि साहाय्य यांमुळे आता मला काहीही त्रास नाही.’ (८.३.२०२३)

२ आ ३ ऊ. कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. साधकांच्या उपचारांचा पाठपुरावा घेणे

आधुनिक वैद्य मराठेकाका ‘साधकाच्या आजाराची कारणे शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक आहेत ?’ हे साधकाच्या लक्षात आणून देतात. त्यानुसार उपचार घेण्यास ते साधकांना सुचवतात आणि त्यासाठी साहाय्यही करतात. साधक त्यानुसार उपचार घेत असल्याचा ते पाठपुरावाही घेतात.

२. कोरोना झालेल्या रुग्णांची काळजी घेणे

मला घरी असतांना कोरोना झाल्यावर काका स्वतः प्रतिदिन ३ वेळा माझा आढावा घ्यायचे. आमच्या कुटुंबातील तिघांना कोरोना झाल्यावर काका त्यांचाही प्रतिदिन ३ वेळा आढावा घेऊन मानसिक आधार देत होते. ते ‘कुठली औषधे घ्यायला हवीत आणि पुढे काय करायला हवे ?’, याकडे लक्ष ठेवून मार्गदर्शन करत असत. त्यामुळे आम्ही आणि अनेक साधकही कोरोनासारख्या महामारीतून जिवंत राहिले आहेत.’ (२३.३.२०२३)

२ आ ३ ए. सौ. माधवी घाटे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा.

१. आपलेपणाने रुग्णाची विचारपूस करणे

‘बर्‍याच वेळा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना रुग्णाईत असायचे. त्यामुळे मला आधुनिक वैद्य मराठेकाका यांच्याकडे पुष्कळ वेळा प्रकृती दाखवायला जावे लागत असे. त्या वेळी ‘त्यांनी मला कोणती औषधे दिली ?’, हे त्यांना अजून आठवते. ते मला सांगतात, ‘‘तुम्हाला मी अमुक औषधे दिली होती. त्यामुळे तुम्हाला बरे वाटले होते.’’ काकांमध्ये आपलेपणा पुष्कळ प्रमाणात आहे. काही दिवसांनी त्यांना मी कुठेही दिसल्यावर ते ‘आता कसे वाटते ?’, असे मला आवर्जून विचारतात.

२. दिलेल्या औषधाची रुग्णाला सर्व माहिती देणे

काका रुग्णांना औषधे द्यायची म्हणून देत नाहीत, तर ‘त्या औषधांची वैशिष्ट्ये सांगून त्या औषधाने काय परिणाम होणार ? ते औषध शरिरात काय कार्य करते ?’, हे सर्व ते रुग्ण साधकांना समजावून सांगून औषध देतात.

काकांचे गुणवर्णन करतांना माझी भावजागृती होत आहे. ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हाला पुष्कळ चांगले वैद्य दिले आहेत’, त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता वाटते.’ (७.३.२०२३)

(क्रमशः)