सर्वांशी जवळीक असणारे आणि साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे) !

पूर्वी ‘डॉक्‍टर म्‍हणजे देव’, असे समजत असत. त्‍या काळी काही प्रमाणात सात्त्विकता असल्‍याने वैद्य साधना करणारे असत. पुढे कौटुंबिक वैद्य (फॅमिली डॉक्‍टर) ही संकल्‍पना रूढ झाली. यामध्‍ये डॉक्‍टर एका कुटुंबातील सदस्‍याप्रमाणेच असायचा. रुग्‍णाला पहाताक्षणी त्‍याला कोणते औषध द्यायला हवे किंवा याच्‍यावर कसे उपचार करायला हवेत ? हे वैद्यांना समजत असे. असेच एक वैद्य रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आहेत आणि ते म्‍हणजे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठेकाका ! मराठेकाका साधना करणारे असल्‍याने अनेकांना त्‍यांचा आधार वाटतो. या लेखमालेत आपण ‘मराठेकाकांनी केलेली साधना, तसेच सर्वांशी जवळीक साधणार्‍या, सतत हसतमुख, प्रसन्‍न, उत्‍साही आणि आनंदी असणार्‍या मराठेकाकांविषयी साधकांना काय वाटते ?’, हे जाणून घेऊया. काल आपण काही साधकांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे पाहिली. आज त्‍यापुढील सूत्रे पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/733231.html

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

२. गुणवैशिष्‍ट्ये

२ आ. साधक

२ आ ३ आ. श्री. देवदत्त कुलकर्णी

श्री. देवदत्त कुलकर्णी

(आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ८० वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. तत्‍परतेने निर्णय घेणे : ‘वर्ष २०२० मध्‍ये माझी पत्नी रुग्‍णाईत होती. तिला पलंगावरून उठणेही शक्‍य नव्‍हते. असे होऊन केवळ दोन दिवस झाल्‍यानंतर आधुनिक वैद्य मराठेकाकांनी ‘तिला ‘बेडसोअर’ (शय्‍याव्रण किंवा दाबव्रण) होऊ नयेत’, यासाठी लगेचच ‘एअरबेड’ आणून दिला. काकांची ही तत्‍परता पाहून आम्‍हाला कृतज्ञता वाटली. काकांनी पत्नीच्‍या रुग्‍णाईत स्‍थितीविषयी वेळोवेळी पटापट निर्णय घेतले.

२. तत्‍परतेने योग्‍य निर्णय घेऊन रुग्‍णालयातील आधुनिक वैद्यांशी बोलून रुग्‍ण साधकाला साहाय्‍य करणे : नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये मला हृदयविकाराचा झटका आल्‍याने बांबोळी येथील रुग्‍णालयात भरती केले होते. तेव्‍हा तेथील आधुनिक वैद्यांनी माझी ‘अँजिओप्‍लास्‍टी’ (हृदयाच्‍या स्नायूंना रक्‍तपुरवठा करणार्‍या रक्‍तवाहिन्‍या उघडण्‍यासाठी करण्‍यात येणारे शस्‍त्रकर्म) करण्‍याचा दिनांक दीड मासानंतरचा दिला. हे मराठेकाकांना कळल्‍यावर त्‍यांनी बांबोळी येथील रुग्‍णालयात ‘अँजिओप्‍लास्‍टी’ न करता ‘अपोलो’ रुग्‍णालयात करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यांनी ‘अपोलो’ रुग्‍णालयातील आधुनिक वैद्यांशी बोलून घेतले. दुसर्‍या दिवशी त्‍यांनी आम्‍हाला सांगितले, ‘‘अपोलो येथील आधुनिक वैद्यांना दाखवून लगेचच ‘अँजिओप्‍लास्‍टी’ करून घ्‍या.’’ दुसर्‍या दिवशी आम्‍ही ‘अपोलो’ रुग्‍णालयात गेल्‍यावर तेथील आधुनिक वैद्यांनी लगेचच माझी ‘अँजिओप्‍लास्‍टी’ केली. केवळ मराठेकाकांमुळे हे सारे शक्‍य झाले.

३. रुग्‍णाच्‍या त्रासासंदर्भात जेव्‍हा आवश्‍यकता वाटेेल, तेव्‍हा ते सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍याशीही आध्‍यात्मिक उपायांच्‍या संदर्भात बोलतात आणि साधकांना नामजपादी उपाय सांगतात.

४. मराठेकाकांशी बोलल्‍यावर आधार वाटणे : ‘आधुनिक वैद्यांशी बोलल्‍यावरच रुग्‍णाचा निम्‍मा आजार बरा व्‍हायला हवा’, असे मराठेकाकांच्‍या संदर्भात होते. त्‍यांच्‍याशी बोलल्‍यावरच मला पुष्‍कळ बरे वाटते. त्‍यामुळे मला त्‍यांचा पुष्‍कळ आधार वाटतो.’ (१५.३.२०२३)

२ आ ३ इ. सौ. अनुश्री रोहित साळुंके

सौ. अनुश्री साळुंके

(आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. रुग्‍णांशी आपलेपणाने वागणे : ‘आधुनिक वैद्य मराठेकाका त्‍यांच्‍याकडे आलेल्‍या रुग्‍ण साधकाला ‘मी अजून चांगले काय देऊ शकतो ?’, असा विचार करतात. हे सर्व काका मनापासून आणि आपलेपणाने करतात.

२. रुग्‍णांचे बोलणे पूर्ण ऐकून घेऊन रुग्‍णांच्‍या सर्व शंकांचे निरसन करणे : मराठेकाका कितीही व्‍यस्‍त किंवा घाईत असले, तरी ते त्‍यांच्‍याकडे आलेल्‍या रुग्‍ण साधकाचेे संपूर्णपणे ऐकून घेऊन त्‍याला योग्‍य ते मार्गदर्शन करतात. ते कधीही कुठल्‍याही साधकाला विषय थोडक्‍यात सांगून संपवत नाहीत. ते साधकाच्‍या प्रत्‍येक शंकेचे पूर्ण निरसन करतात.

३. कुठल्‍याही वेळी रुग्‍ण साधकाला तत्‍परतेने साहाय्‍य करणे : डॉ. मराठेकाका आणि आम्‍ही एकाच इमारतीत रहातो. काही वर्षांपूर्वी माझ्‍या सासूबाईंना (श्रीमती रजनी साळुंके यांना) मध्‍यरात्री त्रास व्‍हायला लागला. त्‍यांचा त्रास बघून ‘आम्‍हाला काय करावे ?’, ते सुचत नव्‍हते. ती रात्रीची वेळ होती; परंतु सासूबाईंची स्‍थिती खालावत असल्‍यामुळे आम्‍ही काकांना भ्रमणभाष केला. काका लगेचच त्‍यांच्‍या जवळची उपकरणे घेऊन सासूबाईंना तपासायला आले. त्‍यांची झोपमोड झाली होती; परंतु त्‍यांनी आम्‍हाला सहकार्य केले. सासूबाईंच्‍या शारीरिक स्‍थितीचा अंदाज घेऊन त्‍यांनी सासूबाईंना सकाळी रुग्‍णालयात भरती करायला सांगितले.

४. रुग्‍ण साधिकेची औषधे लक्षात ठेवणे : माझ्‍या आईला (सौ. अनुपमा जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ७० वर्षे)) मधुमेह आणि हृदयविकार यांचा त्रास आहे. तिला बरीच औषधे चालू आहेत. तिला द्यायची औषधे माझ्‍या लक्षात रहात नाहीत; पण काकांच्‍या ती बरोबर लक्षात रहातात. ते आईची स्‍थिती पाहून ‘काय करायला हवे ?’, ते आम्‍हाला व्‍यवस्‍थित सांगतात.

५. रुग्‍ण साधकाच्‍या भ्रमणभाषला त्‍वरित प्रतिसाद देऊन विचारपूस करणे : बांबोळी येथील शासकीय रुग्‍णालयात गेल्‍यावर तेथील आधुनिक वैद्यांनी जे सांगितले, ते काकांना त्‍वरित कळवायचे असते. अशा वेळी ‘काकांनी भ्रमणभाष घेतला नाही किंवा काकांचा भ्रमणभाष आला नाही’, असे कधीच होत नाही. रुग्‍ण बांबोळीला जाऊन आल्‍यावर काका स्‍वतःहून त्‍या रुग्‍णाची विचारपूस करतात. ‘तेथील आधुनिक वैद्यांनी त्‍यांना काय सांगितले ?’, हेही ते जाणून घेतात.’

(८.३.२०२३)

(क्रमशः)