‘एकदा मी छायाचित्रांशी संबंधित सेवा करत होते. काही छायाचित्रे पहातांना जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची काही वैशिष्ट्ये लक्षात आली.
१. अनेक संत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेटी देत असणे
प.पू. डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० मध्ये त्यांचे गुरु इंदूर येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने सनातन भारतीय संस्कृती संस्थेची स्थापना केली. ‘गावोगावी जाऊन लोकांना ईश्वरभक्तीचे महत्त्व सांगणे, स्थानिक संतांच्या भेटी घेणे, त्यांचे कार्य जाणून घेऊन हिंदूंचे संघटन होण्यासाठी प्रयत्न करणे’, ही उद्दिष्टे समोर ठेवून प.पू. डॉक्टरांचे अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू झाले. तत्पूर्वी आणि त्यानंतरही त्यांनी अनेक संतांच्या भेटी घेतल्या. सनातनच्या कार्याची व्याप्ती वाढल्यावर त्यांनी ‘सनातन संस्था’ स्थापन केली. अनेक उच्च आध्यात्मिक अधिकार असलेले संत आणि काही स्वतःला संत म्हणवून घेणारे तथाकथित संत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊ लागले. ते संस्थेचे कार्य जाणून घेऊ लागले. आजतागायत शेकडो संतांनी सनातनच्या आश्रमाला भेटी दिल्या. अनेक जणांची प.पू. गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) प्रत्यक्ष भेटही झाली.
२. ‘अतिथी देवो भव ।’ हे वचन आचरणात आणणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
छायाचित्रे पहातांना माझ्या मनात विचार आले, ‘संतांचा तथाकथितपणा किंवा वरवरचे संतत्व माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या लक्षात येते, तर त्याविषयी प.पू. गुरुदेवांच्या निश्चितच लक्षात येत असेल. असे असूनही प.पू. गुरुदेव ‘अतिथी देवो भव ।’ हे वचन आचरणात आणत आहेत. त्यांनी नेहमीच सर्वांचा आदर-सत्कार केला आणि आजही करत आहेत. त्यांनी स्वतःकडे न्यूनत्व घेऊन इतरांना मोठेपणा दिला. हीच शिकवण प.पू. गुरुदेवांनी सर्वत्रच्या साधकांना दिली. त्यांनी साधकांना सनातनच्या आश्रमांना भेटी देणार्या सर्व संतांचे आदरातिथ्य करायला शिकवले.’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अहंविरहित स्थिती
जीवनाडीपट्टीमध्ये महर्षींनी सांगितले आहे, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. ते पृथ्वीवरील आध्यात्मिक जगताच्या सर्वोच्च पदी विराजमान आहेत.’ असे असूनही ते नेहमीच साधेपणाने रहातात, स्वतःकडे न्यूनत्व घेतात आणि इतरांचे आपुलकीने आदरातिथ्य करतात. ही त्यांची वैशिष्ट्ये माझ्या मनावर पुन्हा एकदा अधोरेखित झाली.’
– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.९.२०२३)