Israel Hamas Yemen conflict : गाझातील आक्रमणात हमासचे ५० आतंकवादी ठार झाल्याचा इस्रायलचा दावा

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने ३१ ऑक्टोबरच्या रात्री उत्तर गाझा पट्टीतील सर्वांत मोठ्या जबलिया निर्वासित छावणीवर केलेल्या आक्रमणात हमासचे ५० आतंकवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

यात हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम बियारी याचा समावेश आहे. दुसरीकडे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, इस्रायलच्या आक्रमणामध्ये १२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक घायाळ झाले आहेत. इस्रायलचे २ सैनिक ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली आहे. इजिप्तने सांगितले की, घायाळ पॅलेस्टिनींना गाझा-इजिप्तमधील राफा सीमा ओलांडण्याची अनुमती दिली जाईल जेणेकरून त्यांच्यावर योग्य उपचार होतील.

येमेनमधील हुती आतंकवाद्यांचा प्रवक्ता याह्या याने सांगितले की, त्यांनी इस्रायलच्या इलात शहरावर ड्रोनद्वारे, तसेच बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे यांद्वारे आक्रमण केले. हे आक्रमण गाझातील लोकांच्या समर्थनार्थ करण्यात आले आहे; कारण अरब देश दुर्बल आहेत आणि गुप्तपणे इस्रायलला पाठिंबा देत आहेत. येमेनच्या लोकांची इच्छा आहे की, आम्ही इस्रायलवर आक्रमण करावे. भविष्यातही ही आक्रमणे होणार आहेत. आम्हाला ठाऊक आहे की, इस्रायलकडे ‘हवाई संरक्षण यंत्रणा’ (एअर डिफेन्स सिस्टम) आहे आणि त्यांनी आक्रमणे हाणून पाडली आहेत; परंतु आमची आक्रमणे लवकरच यशस्वी होतील.

वर्ष २०१४ मध्ये हुती आतंकवाद्यांनी येमेनची राजधानी साना कह्यात घेतली. आता देशाच्या मोठ्या भागावर त्यांचे नियंत्रण आहे. ‘आपण हमाससमवेत आहोत आणि हमासला सर्वतोपरी साहाय्य करू’, असे हुतीने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

इस्रायल-हमास यांच्या युद्धातील १ नोव्हेंबरची क्षणचित्रे

  • येमेनमधील हुती आतंकवाद्यांकडून होणार्‍या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर येमेनवर आक्रमण करण्यासाठी इस्रायलकडून त्याच्या युद्धनौका येमेनच्या दिशेने तैनात
  • हमासची ११ सहस्र ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा
  • गाझामध्ये कारवाई करतांना इस्रायलचे आतापर्यंत ११ सैनिक ठार
  • येत्या काही दिवसांत काही विदेशी ओलिसांची सुटका करू ! – हमास
  • दक्षिण अमेरिका खंडातील बोलिव्हिया देशाने इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडले
  • कोलंबिया आणि चिली यांनी गाझामधील नागरिकांच्या मृत्यूचा निषेध करत इस्रायलमधून राजदूतांना परत बोलावले