सर्वांशी जवळीक असणारे आणि सनातनच्या साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे) !

पूर्वी डॉक्टर, म्हणजेच आधुनिक वैद्य अनेक शारीरिक यातनांतून मुक्त करतो किंवा प्रसंगी मृत्यूच्या दाढेतूनही बाहेर काढतो; म्हणून ‘डॉक्टर म्हणजे देव’, असे समजत असत. त्या काळी काही प्रमाणात सात्त्विकता असल्याने वैद्य साधना करणारे असत. पुढे कौटुंबिक वैद्य (फॅमिली डॉक्टर) ही संकल्पना रूढ झाली. यामध्ये डॉक्टर एका कुटुंबातील सदस्याप्रमाणेच असायचा. रुग्णाला पहाताक्षणी त्याला कोणते औषध द्यायला हवे किंवा याच्यावर कसे उपचार करायला हवेत ? हे वैद्यांना समजत असे. असेच एक वैद्य रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आहेत आणि ते म्हणजे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठेकाका ! मराठेकाका साधना करणारे असल्याने अनेकांना त्यांचा आधार वाटतो. या लेखमालेत आपण ‘मराठेकाकांनी केलेली साधना, तसेच सर्वांशी जवळीक साधणार्‍या, सतत हसतमुख, प्रसन्न, उत्साही आणि आनंदी असणार्‍या मराठेकाकांविषयी साधकांना काय वाटते ?’, हे जाणून घेऊया.

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७८ वर्षे) 

श्री. प्रकाश मराठे

१ अ. गोव्यातील पहिल्या काही साधकांमधील साधक असलेले आधुनिक वैद्य डॉ. पांडुरंग मराठे ! : ‘वर्ष १९९३ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. तेव्हा गोव्यात १० – १५ च साधक होते, त्यांत आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे होते.

१ आ. अध्यात्माचे सत्संग घेणे : सनातनचे ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’, ‘नामसंकीर्तनयोग व मंत्रयोग’, ‘अध्यात्म’ इत्यादी नवीन ग्रंथ आल्यावर ते आणि आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत मडकई येथील ‘श्री नवदुर्गा’ देवस्थानच्या सभागृहामध्ये साधकांचे सत्संग घेत असत. सहसाधकांच्या समवेत मराठेकाका गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन सनातन संस्थेचे अभ्यासवर्ग (प्रसार करण्याच्या दृष्टीने सनातन संस्थेची आणि अध्यात्माविषयी माहिती सांगणे) घेत असत.

१ इ. नाटकात महत्त्वाची भूमिका करणे : वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या गोव्यात झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात ते सहभागी झाले होते. गोव्यात झालेल्या ‘संत भक्तराज महाराज’ या नाटकात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. वर्ष १९९५ मध्ये झालेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.

१ ई. मोठ्या पदाचा त्याग करणारे सनातन संस्थेमधील पहिले आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे ! : ठाणे (सत्तरी, गोवा) येथे वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफिसर) म्हणून सेवा करतांना त्यांची त्या भागातील लोकांशी चांगली जवळीक होती. सर्वांशी चांगली जवळीक असतांना आणि मोठे पद असूनही त्या पदाचा त्याग करणारे मराठेकाका हे सनातन संस्थेमधील पहिले आधुनिक वैद्य आहेत. आधुनिक वैद्य मराठे यांच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय विभागाच्या खातेप्रमुखांना मराठेकाकांविषयी पुष्कळ आपुलकी होती. त्यामुळे त्यांना आधुनिक वैद्य मराठे यांना सोडायचे नव्हते, तरी त्यांची साधनेची तळमळ पाहून त्यांनी त्यांचे त्यागपत्र स्वीकारले आणि त्यांना सर्वतोपरी साहाय्य केले.

१ उ. साधनेच्या तीव्र तळमळीमुळे अनेक ठिकाणी प्रसाराची मुहूर्तमेढ रोवणे : मराठेकाका त्यांची पत्नी सौ. मंगला मराठे यांनाही स्फूर्ती देत होते. दोन्ही मुले लहान असतांना आणि मुलगा रुग्णाईत असतांनाही मुलांना घरात ठेवून आधुनिक वैद्य मराठे आणि सौ. मंगला मराठे वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारासाठी जात असत. काही वेळा त्यांनी नुसता ताक-भात खाऊन प्रचाराची सेवा केली. त्यांनी गोव्यात अध्यात्म आणि ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ या विषयावर विविध ठिकाणी प्रवचने घेतली. महाराष्ट्रातील विदर्भ आणि इतर जिल्ह्यांत मराठेकाकांच्या ओळखीचे कुणी नसतांनाही त्यांनी गोव्यातील काही साधकांना समवेत घेऊन तिथे प्रसाराची मुहूर्तमेढ रोवली. काश्मीर येथे आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांच्या समवेत जाऊन त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रवचने घेतली.

१ ऊ. त्यागी वृत्ती

१. पहिल्यापासून सनातन संस्थेला स्वतःची अशी जागा नव्हती, तेव्हा मराठेकाकांनी धामसे येथील त्यांचे रहाते घर आणि सभोवतालची जागा सनातन संस्थेला वापरायला दिली. त्या जागेत साधकांच्या रहाण्याची सोय आणि इतर काही सोयीही करून दिल्या. सनातन संस्थेला बरीच वर्षे त्याचा लाभ आला.

२. त्यांच्या बागेत लागणारे नारळ, फणस, पेरू, अळू इत्यादी गोष्टी ते आश्रमात अर्पण म्हणून पाठवतात.

१ ए. साधकांच्या जवळच्या नातेवाइकाला रुग्णाच्या स्थितीची पूर्ण कल्पना देणे : चिकित्सालयात येणार्‍या सर्व साधकांना ते समत्वाने वागवतात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात. माझी पत्नी सौ. शालिनी मराठे (आताच्या पू. (कै.) सौ. शालिनी मराठे, सनातनच्या १२२ व्या व्यष्टी संत) यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हा त्यांनी मला ते लगेच सांगून माझ्या मनाची सिद्धता करून घेतली.

१ ऐ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा : आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांची प.पू. डॉ. आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्यावर श्रद्धा आहे. त्यामुळे ते झोकून देऊन सेवा करतात.

‘प.पू. डॉक्टरांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्याकडून चार शब्द लिहून घेतले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(११.३.२०२३)

२. गुणवैशिष्ट्ये

२ अ. कुटुंबीय

२ अ १. वैद्या (सौ.) अपर्णा हृषिकेश नाईक आणि श्री. हृषिकेश सुरेश नाईक (आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांची मुलगी आणि जावई), फोंडा, गोवा.

२ अ १ अ. सकारात्मक रहाणे : ‘माझे (वैद्या (सौ.) अपर्णा नाईक यांचे) बाबा (आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे) प्रत्येक प्रसंगात सकारात्मक असतात. ते ताण घेत नाहीत.

२ अ १ आ. रुग्णाशी बोलून त्याचा ताण न्यून करणे : त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीला ताण आला असेल, तर बाबांशी बोलल्यावर त्या व्यक्तीचा ताण न्यून होतो. एखाद्या रुग्णाला आजाराविषयी ताण किंवा भीती वाटत असल्यास बाबांशी बोलल्यावर त्याची भीती न्यून होते.

२ अ १ इ. ते एखादी व्याधी किंवा आजारपण याचा सर्व बाजूंनी व्यवस्थित अभ्यास करून त्यानुसार चिकित्सा करतात.

अ १ ई. त्यांच्या सेवेची व्याप्ती अधिक असूनही ते व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करतात.’

(९.३.२०२३)

२ अ २. श्री. सुरेश श्रीनिवास नाईक, फोंडा, गोवा. (डॉ. मराठे यांचे व्याही, जावयाचे वडील)

२ अ २ अ. साधकांना आधार देणे : ‘माझी आई रुग्णाईत असतांना ती रुग्णालयात जाण्यास सिद्ध नसायची. ती म्हणायची, ‘‘मराठेकाका येणार असतील, तर मी येईन’’ आणि काकाही रुग्णालयात येण्यास कधी ‘नाही’ म्हणायचे नाहीत. रुग्णाईत असतांना आईला काकांचा मानसिक आधार वाटायचा.’

(७.३.२०२३)

२ आ. साधक

२ आ १. कु. शिल्पा गोवेकर, फोंडा, गोवा.

२ आ १ अ. मराठेकाका परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे भासणे : ‘वर्ष २०२१ मध्ये आम्ही हैद्राबादला असतांना आम्हाला कोरोना झाला होता. तेव्हा आम्ही (मी आणि आई, श्रीमती शैलजा गोवेकर) औषधोपचारासाठी डॉ. मराठेकाकांच्या संपर्कात होतो. त्यांना संपर्क करतांना माझ्या तोंडात ‘परम पूज्य’ (परात्पर गुरु डॉ. आठवले) असे नाव येत असे. तेव्हा मला ‘साक्षात् परम पूज्य समोर आहेत आणि आम्हाला उपचार सांगत आहेत’, असे वाटत होते. आम्ही हैद्राबादहून गोव्याला स्थलांतरित झाल्यावर आईचा आजार वाढत होता. तेव्हाही आम्ही डॉ. मराठेकाकांशी बोलतांना मला ‘साक्षात् परम पूज्यांशी बोलत आहे’, असे वाटत असे. माझ्या आईला ‘त्यांच्या माध्यमातून देवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) भेटला आणि तेच माझ्यावर उपचार करत आहेत’, असे वाटत असे.’ (१२.४.२०२३)

(क्रमशः)


आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांची सर्व साधकांनी शिकावी, अशी गुणवैशिष्ट्ये !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी वर्ष १९९१ मध्ये गोव्यात अभ्यासवर्ग घ्यायचो. तेव्हापासून सनातनच्या माध्यमातून साधनेला आरंभ केलेल्या साधकांपैकी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे एक साधक आहेत. त्यांनी स्वतः साधना करण्यासोबत त्यांची पत्नी आणि मुले यांनाही साधनेसाठी प्रोत्साहन दिले. साधकांनी लिहून दिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये वाचून ‘कलियुगात वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून साधना करून साधनेत कशी प्रगती करू शकतो’, याचा आदर्श आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे ! त्यांची पुढील आध्यात्मिक प्रगतीही अधिक जलद गतीने होईल !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले    

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक