सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘त्रिपुरासुंदरी यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !     

‘१७.१०.२०२३ या दिवशी सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात ‘त्रिपुरासुंदरी यागा’चे आयोजन करण्‍यात आले होते. यागाचा उद्देश पुढीलप्रमाणे होता, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्‍यूयोग टळून त्‍यांना आरोग्‍यपूर्ण दीर्घायुष्‍य प्राप्‍त व्‍हावे, साधकांच्‍या सर्व त्रासांचे निवारण व्‍हावे आणि हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना लवकरात लवकर व्‍हावी.’ या यागाचे देवाने माझ्‍याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

श्री. राम होनप

१. यागाला आरंभ होताच ‘यज्ञकुंडातून व्‍याघ्रावर बसलेली आणि हातात त्रिशूळ धारण केलेली एक देवी वर आली आहे’, असे दृश्‍य मला सूक्ष्मातून दिसले.

२. यागाच्‍या मंत्रांतील तालावर पाताळात प्रत्‍येकाच्‍या एका हातात भाला असलेल्‍या असुरांचा एक गट नृत्‍य करतांना दिसला.

३. यज्ञवेदीपासून अर्धा मीटर उंचीवर हातांत सोनेरी पात्र घेतलेली एक देवी दिसली. त्‍या पात्रात द्रव्‍य असून त्‍या द्रव्‍यात विविध देवतांची तत्त्वे होती. त्‍यात शक्‍ती, ज्ञान, आरोग्‍य आणि धन हे अंतर्भूत होते. ते द्रव्‍य वायूरूपात येऊन वातावरणात पसरले.

४. ‘हीना’ या अत्तराची आहुती देण्‍यापूर्वी यज्ञकुंडाच्‍या भोवती पांढर्‍या रंगाचे दैवी कवच निर्माण झाले होते. हे कवच ‘असुरांनी आहुतीचे फळ चोरू नये’, यासाठी निर्माण झाले होते. ‘हीना’ या अत्तराची आहुती दिल्‍यानंतर यज्ञकुंडात गुलाबी रंगाचा दैवी प्रकाश निर्माण झाला. त्‍यानंतर त्‍या प्रकाशाचे रूपांतर गुलाबी रंगाच्‍या दैवी कणांमध्‍ये झाले आणि ते कण तेथे उपस्‍थित असलेल्‍या साधकांच्‍या दिशेने प्रक्षेपित झाले.

५. ‘यागाच्‍या परिसरात पांढर्‍या रंगाचा सदरा परिधान केलेले परात्‍पर गुरु डॉ. आठवले अधूनमधून उपस्‍थित आहेत’, असे दृश्‍य मला सूक्ष्मातून दिसले.

६. यज्ञ चालू असतांना माझ्‍या शेजारी बसलेले साधक श्री. गिरीश पाटील मला म्‍हणाले, ‘‘मला यज्ञकुंडाच्‍या परिसरात सूक्ष्मातून एक स्‍त्री नृत्‍य करतांना दिसत आहे. तुम्‍हाला ती दिसत आहे का ?’’ त्‍यानंतर मी त्‍या जागेचे सूक्ष्म परीक्षण केले आणि त्‍यांना म्‍हणालो, ‘‘लाल रंगाचे वस्‍त्र नेसलेली आणि पायात चंदेरी रंगाचे पैंजण घातलेली एक स्‍त्री नृत्‍य करत आहे.’’ त्‍यानंतर श्री. पाटील म्‍हणाले, ‘‘हो. मलाही लाल रंगाच्‍या वस्‍त्रातील स्‍त्री दिसत आहे; पण ती चांगली शक्‍ती आहे कि त्रासदायक ?’’ तेव्‍हा मी सूक्ष्म परीक्षण केल्‍यावर मला त्‍या स्‍त्रीच्‍या जागी भयानक अनिष्‍ट शक्‍तीचा अक्राळविक्राळ चेहरा दिसला. तिला पाहून मला थोडी भीती वाटली. यावरून ‘नृत्‍य करणारी स्‍त्री शक्‍ती ही मायावी अनिष्‍ट शक्‍ती आहे’, हे माझ्‍या लक्षात आले.

७. लघुपूर्णाहुती दिल्‍यानंतर यागातून एक देव आणि एक देवी वर येतांना दिसली.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२३)     

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.