देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलोचना नेताजी जाधव (वय ७७ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !
२०.१०.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. सुलोचना नेताजी जाधवआजी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७७ वर्षे) यांचे निधन झाले. ३१.१०.२०२३ या दिवशी जाधवआजींच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या निधनाविषयी मिळालेल्या पूर्वसूचना आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्री. नेताजी जाधव (कै. (सौ.) सुलोचना जाधव यांचे यजमान, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८३ वर्षे)
१ अ. ‘आम्ही दोघे (मी आणि सौ. सुलोचना जाधव) एकमेकांशी आदराने बोलायचो.
१ आ. निधन : २०.१०.२०२३ या दिवशी सौ. सुलोचना यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्यांनी पलंगावर टाकून दिले. त्या वेळी त्यांचे तोंड उघडे होते. तेव्हा त्यांचे प्राण तोंडातून गेल्याचे मला जाणवले.
१ इ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. त्यांच्या निधनानंतर त्यांचा तोंडवळा आनंदी दिसत होता.
२. त्यांच्या तोंडवळ्यावर समाधान आणि तेज जाणवत होते.’
२. श्रीमती भारती गलांडे ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांची मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६१ वर्षे), रामनाथी आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. मुलांवर धार्मिकतेचे संस्कार करणे : ‘आईने आमच्यावर चांगले संस्कार केले. घरात कोणताही पदार्थ बनवला किंवा बाजारातून फळे आणली, तर त्यांचा देवाला नैवेद्य दाखवून मगच आम्ही तो पदार्थ किंवा फळे प्रसाद म्हणून ग्रहण करायचो. ती पूजा करत असतांना श्लोक आणि स्तोत्रे म्हणत असे. त्यामुळे घरातील वातावरण पवित्र होत असे. तिला प्रवचन आणि कीर्तन ऐकण्याची आवड होती. ती आम्हालाही तिच्या समवेत कीर्तन-प्रवचन ऐकण्यासाठी देवळात घेऊन जात असे. तेव्हा आम्हाला काही कळत नव्हते; पण त्या सात्त्विकतेचा आमच्यावर सकारात्मक परिणाम होत असे. तिची स्वयंपाक करण्याची पद्धत सात्त्विक होती. ती प्रवचनात ऐकलेले विचार करत स्वयंपाक करायची. ती सण, व्रते, उपवास आणि धार्मिक ग्रंथांचे पारायण करत असे. त्याचे संस्कार आमच्यावरही झाले.
‘गुरुदेवांनी आमच्यावर धार्मिक संस्कार करून आणि आम्हाला धर्माचरण शिकवून साधनावृद्धीसाठी पूरकता देणारी आई आम्हाला (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) देऊन आमच्यावर कृपावर्षावच केला’, याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
२ आ. आईच्या निधनाविषयी मिळालेली पूर्वसूचना ! : २०.१०.२०२३ या दिवशी सायंकाळी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील यांचा मला भ्रमणभाष आला. तो उचलण्यापूर्वीच माझ्या मनात विचार आला, ‘‘आई गेली.’’ तेव्हा त्यांनी आईची स्थिती गंभीर असल्याचे मला सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने तिचे निधन झाल्याचे मला समजले.
२ इ. आईच्या निधनानंतर बाबांना त्रास होत असल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्यांनी नामजप केल्यावर बाबांची स्थिती चांगली होणार असल्याचे सांगणे : २५.१०.२०२३ या दिवशी माझे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘आईचे निधन झाल्यानंतर बाबांना त्रास होत आहे.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आई-बाबा ६० वर्षे एकमेकांच्या समवेत होते. दोघांना एकमेकांचा आधार होता. त्यामुळे त्यांना आईची आठवण येणे साहजिक आहे. त्यांना नामजप करायला सांगा. नामानेच संस्कार नष्ट होतील. गुरुदेवांचे लक्ष आहे. बाबा आश्रमात जाऊन साधकांच्या समवेत राहिल्यावर चांगले होतील.’’
२ ई. आईने गुरुदेवांना केलेली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचल्याची आलेली प्रचीती ! : वर्ष २०२३ च्या आरंभी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात गेल्यावर त्यांनी आईला कुशीत घेतले होते. त्या वेळी आईने त्यांना सांगितले होते, ‘‘चालता-बोलता, तसेच सेवा आणि साधना करतांना मला मरण येऊ दे’, अशी माझी प्रार्थना गुरुदेवांना सांगा.’’ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी गुरुदेवांना तसे सांगितले. त्या वेळी गुरुदेवांना फार आनंद झाला.
खरोखरच आईची स्थिती चांगली असतांनाच तिचे निधन झाले. त्यामुळे ‘आईची प्रार्थना गुरुदेवांपर्यंत पोचली’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या.
२ उ. आलेल्या अनुभूती
२ उ १. गुरुकृपेने आगगाडीचे तिकीट मिळून आईच्या अंत्यसंस्कारासाठी देवद आश्रमात वेळेत पोचता येणे : मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून निघण्यासाठी आईच्या निधनानंतरच्या दुसर्या दिवशी पहाटे ३.४० वाजताच्या आगगाडीचे तिकीट मिळाले होते; मात्र गुरुदेवांच्या कृपेने मला त्याच रात्री ११.४० वाजताच्या आगगाडीचे तिकीट मिळाले. गाडी ३० मिनिटे विलंबाने निघूनही मी देवद आश्रमात दुसर्या दिवशी दुपारी वेळेत पोचले.
२ उ २. केवळ गुरुदेवांच्या कृपेने मला या परिस्थितीत स्थिर आणि शांत रहाता आले.
२ ऊ. आईच्या मृत्यूत्तर विधींच्या वेळी नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे
१. आईच्या मृत्यूत्तर विधींच्या वेळी सर्वांना शांती आणि चैतन्य जाणवले.
२. सर्वांना तीर्थक्षेत्री जाऊन आल्यासारखे वाटले.
३. ग्रामीण भागातील नातेवाईक आणि कुटुंबीय या सर्वांना हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे अंत्यविधी करण्याचे महत्त्व ठाऊक होते. गुरुदेवांच्या कृपेने त्याप्रमाणे सर्व झाल्याने सर्वांना शांतता आणि स्थिरता अनुभवता आली.’
३. प्रा. डॉ. रविकिरण नेताजी जाधव ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांचा मुलगा), सोलापूर
३ अ. आईचे आध्यात्मिक जीवन आणि तिने केलेली साधना : ‘माझे आजोबा (आईचे वडील) (कै.) जनार्दन कार्ले उर्फ जगन्नाथ महाराज हे हिंचगिरी (सोलापूर) मठातील आध्यात्मिक गुरु होते. त्यांनी आईला ज्ञानेश्वरी आणि भगवद़्गीता हे दोन ग्रंथ भेट म्हणून दिले होते, तसेच तिला एकादशीचा नियमित उपवास करण्यास सांगितले होते. आईचे शिक्षण तिसरीपर्यंत झाले होते. तिने प्रयत्नपूर्वक वडिलांनी दिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची अनेक पारायणे केली. मराठीत भाषांतर केलेली भगवद़्गीता ती नेहमी वाचत होती; परंतु ‘संस्कृत श्लोकांसह भगवद़्गीता वाचता आली पाहिजे’, अशी तिची पुष्कळ इच्छा होती. पुढे श्री. बोळकुटेगुरुजींनी तिला भगवद़्गीता संस्कृतमध्ये वाचायला शिकवली. भगवद़्गीतेतील १२ वा आणि १५ वा अध्याय तिने मुखोद़्गत केला होता. त्या काळात तिने अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.
सोलापूर येथील श्री जगन्नाथ मंदिरातील ‘कृष्ण कन्हैया दास प्रभुजी’ यांच्या मार्गदर्शनामुळे आईची श्रीकृष्णभक्ती दृढ झाली. आईचे आध्यात्मिक गुरु श्री महाविष्णु प्रभु यांनी तिचे नामकरण ‘सुदेवी’, असे केले होते आणि तिला सोळा माळांचा ‘हरे कृष्ण’, या महामंत्राचा जप नियमित करायला सांगितला होता.
तिने चार धाम यात्रा आणि भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची तीर्थयात्रा पूर्ण केली होती. तिने २ वेळा श्री गोवर्धन परिक्रमा पूर्ण केली होती.
३ आ. देवद आश्रमातील आईचे वास्तव्य, म्हणजे तिच्या आध्यात्मिक जीवनातील परमोच्च अवस्था असणे : माझी आई वर्ष २०१२ पासून साधनेसाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होती. देवद येथील वास्तव्य म्हणजे तिच्या आध्यात्मिक जीवनातील परमोच्च अवस्था होती. परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने तिच्या साधनेसाठी हा काळ अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा होता.
३ इ. आईची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली अविस्मरणीय प्रथम भेट ! : माझी मोठी बहीण श्रीमती भारतीताई (श्रीमती भारती गलांडे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करते. आईला रामनाथी आश्रमामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे तिची परम पूज्यांशी झालेली प्रत्यक्ष भेट तिच्यासाठी अविस्मरणीय होती. या भेटीचे वर्णन ती आम्हाला नेहमी सांगत असे.
३ ई. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
३ ई १. ‘आईवर अंतिम संस्कार करणे’, हा दिव्य अनुभव असल्याचे जाणवणे : यापूर्वी मी माझे अनेक नातेवाईक आणि आप्तस्वकीय यांच्या अंतिम संस्कारामध्ये सहभाग घेतला आहे; परंतु माझ्या आईचा अंतिम संस्कार ज्या पद्धतीने झाला, तसा अंतिम संस्कार मी आजपर्यंत पाहिला नव्हता. तो एक दिव्य अनुभव होता.
३ ई २. एक अदृश्य शक्ती माझ्याकडून ते सर्व विधी करून घेत असल्याचे मला जाणवत होते.
अखंड साधना, पूर्वपुण्याई आणि परम पूज्यांचे आशीर्वाद घेऊन माझी आई पारलौकिक जगात निघून गेली. ‘तिच्या आत्म्यास चिरशांती आणि सद़्गती मिळो’, अशी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो.’
४. सौ. संगीता अरुण बोहिटे ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांची दुसरी मुलगी), विजयपूर, कर्नाटक.
अ. ‘आईचे अंत्यदर्शन घेतांना मला तिच्या चेहर्यावर पुष्कळ तेज जाणवत होते.’
५. सौ. विजया जुगदार ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांची तिसरी मुलगी), छत्रपती संभाजीनगर
५ अ. ‘माझी प्रेमस्वरूप आई इतरांच्या सेवेसाठी सतत तत्पर होती. ती सगळ्यांना प्रेम देऊन गेली. तिच्या मुखात सतत हरिनाम होते.
५ आ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. आईच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतांना ‘ती शांत झोपली आहे’, असे मला वाटले.
२. ‘तिचे ओठ हलत आहेत आणि तिचा नामजप चालू आहे’, असे मला वाटले.
३. माझी दृष्टी तिच्या चेहर्यावरून हटत नव्हती. तेव्हा मला वाटत होते, ‘ती गुरुचरणांशी एकरूप होऊन निर्गुण अवस्थेतील आनंदावस्था अनुभवत आहे.’
४. माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप आपोआप चालू झाला.
५. अंत्यविधीच्या वेळी ‘आम्ही सगळे जण एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलो आहोत’, असे मला वाटत होते.’
६. श्री. माणिक कार्ले ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांचा लहान भाऊ, वय ७५ वर्षे), अणदूर, तुळजापूर, जिल्हा धाराशिव.
अ. ‘अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे जाऊ लागली. तेव्हा सर्व जण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘हरे राम हरे कृष्ण ।’, असा नामजप करत होते. त्या वेळी वातावरण शांत वाटत होते.’
७. सौ. रोहिणी रविकिरण जाधव ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांची सून), सोलापूर
७ अ. सौ. सुलोचना जाधव यांच्या निधनाच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना !
७ अ १. नवरात्रीत घटाची पूजा करत असतांना फुलांच्या माळेतील एक फूल माळेत न बसणे आणि त्यानंतर सासूबाईंचे निधन झाल्याचे समजणे : ‘माझ्या सासूबाई सौ. सुलोचना नेताजी जाधव यांचे निधन झाले, त्या दिवशी नवरात्रीतील ६ वा दिवस होता. आमच्या सोलापूर येथील घरात सकाळी घटाची पूजा करत असतांना फुलांच्या माळेतील एक फूल माळेत बसलेच नाही. तेव्हा मी ते फूल तसेच घटावर ठेवले आणि पूजा पूर्ण केली. त्याच दिवशी सायंकाळी सासूबाई अत्यवस्थ असल्याचा निरोप आम्हाला मिळाला. त्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे आम्हाला समजले. तेव्हा ‘सकाळी पूजेच्या वेळी माळेत फूल न बसणे’, ही त्यांच्या मृत्यूच्या संदर्भातील पूर्वसूचना होती’, असे मला वाटले.’
८. श्री. ऋषिकेश रविकिरण जाधव ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांचा नातू (मुलाचा मुलगा), सोलापूर
८ अ. आजींनी नातवाला लहानपणापासून अध्यात्माची गोडी लावणे : ‘लहानपणापासून आजीने मला अध्यात्माची गोडी लावली. ती मला ‘नामजप करणे आणि धार्मिक ग्रंथ वाचणे’, यांसाठी आग्रह करत असे. प्रतिदिन सायंकाळी ती माझ्याकडून देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हणून घेत असे. प्रत्येक रविवारी ती मला कृष्णाच्या मंदिरात घेऊन जात असे. त्यामुळे माझ्यात कृष्णभक्तीची गोडी निर्माण झाली. ती मला ‘प्रत्येक सणाच्या दिवशी कोणता नामजप करावा ? कोणती साधना करावी ?’, हे सांगत असे.
८ आ. निधनानंतर जाणवलेले सूत्र : तिचे पार्थिव पाहिल्यावर तिच्या चेहर्यावर थकवा न जाणवता चैतन्य जाणवले.’
९. सौ. सुकीर्ती शैलेंद्र केत ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांची नात (मुलीची मुलगी), सोलापूर
९ अ. ‘मी आजीला ‘मोठी आई’ म्हणायचे. मोठ्या आईने आजीवन आचारधर्माचे पालन केले.
९ आ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. आश्रमात आल्यावर ‘मी मोठ्या आईच्या अंत्यविधीसाठी आले आहे’, असे मला वाटतच नव्हते. मोठ्या आईचे पार्थिव आश्रमात जेथे ठेवले होते, तेथील वातावरण प्रसन्न वाटत होते.
२. स्मशानभूमीतील वातावरणही प्रसन्न वाटत होते. सर्व अंत्यविधी मनोभावे पार पडले.’
१०. सौ. ऋतुजा गायकवाड ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांची नात (मुलाची मुलगी), सोलापूर
१० अ. ‘लहानपणापासून माझ्यावर झालेल्या ‘तुळशीसमोर दिवा लावून प्रार्थना करणे, भगवद़्गीता वाचणे, रामरक्षा म्हणणे आणि कृष्णभक्ती करणे’, या सगळ्या संस्कारांचे श्रेय माझ्या आजीला जाते.
१० आ. निधनानंतर जाणवलेले सूत्र : आजीच्या निधनानंतर तिच्या चेहर्यावरील चैतन्य पाहून मी भारावून गेले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.१०.२०२३)
सौ. सुलोचना जाधव यांचे निधन झाल्यावर त्यांचे पती श्री. नेताजी जाधव यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
१. ‘मी मामांना (श्री. नेताजी जाधव यांना) भेटायला गेलो. त्या वेळी ‘त्यांना पत्नी जाण्याचे दुःख झालेे; परंतु साधनेने त्यांना सावरले’, असे मला वाटले.
२. ‘पत्नीला काही भोग भोगावे न लागता मुक्ती मिळाली’, याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसत होते. ‘हे सर्व त्यांनी केलेल्या साधनेमुळे घडले’, असे मला वाटते.’
– श्री. अविनाश साळुंके ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांचा मावस भाऊ, वय ६१ वर्षे), सोलापूर (२९.१०.२०२३)
सौ. सुलोचना जाधव यांच्या अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या नातीला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांविषयी जाणवलेली सूत्रे !
१. ‘आजींच्या अंत्यविधीच्या सेवेतील देवद आश्रमातील साधकांचा सहभाग अत्यंत भावपूर्ण होता. त्यांच्या कृतीमधून त्यांचे आजीबद्दलचे प्रेम व्यक्त होत होते. त्या वेळी आश्रमातील सर्व साधकांचा एकमेकांबद्दलचा आदरभाव लक्षात येत होता.
२. आश्रमातील साधकांनी अंत्यविधीची संपूर्ण सिद्धता केली होती. त्यामुळे आम्हा कुटुंबियांना साधकांचा आधार वाटला. त्याबद्दल आम्ही सर्व साधकांचे मनापासून आभार मानतो. अंत्यविधी शास्त्रोक्त पद्धतीने झालेला पाहून आम्हा सर्वांना समाधान वाटले.’
– सौ. श्रद्धा बचुटे ((कै.) सौ. सुलोचना जाधव यांची नात (मुलीची मुलगी), सोलापूर (२९.१०.२०२३)
कै. (सौ.) सुलोचना जाधवआजी यांनी रचलेल्या जात्यावरील ओव्या !‘प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) वंदन करून जात्यावरच्या ओव्या गाते. दुसरी माजी ओवी गं विठ्ठलदेवाला, सुख वाटते जिवाला । तिसरी माझी ओवी गं, तीन देवांना । चौथी माझी ओवी गं, गाविते (टीप २) राम, सीता, मारुतीला । पाचवी माझी ओवी गं, पाच या पांडवांना । सहावी माझी ओवी गं, गाविते अनेकांना । माझ्या गं अंगणात तुळशीबाईचा आहे घेरा । तुळस माझी माता, रोप माझ्या अंगणी । राम गं मनोराम, राम अमृताचा पेला । राम गं मनोराम, राम नारळाचे घड । राम गं मनोराम, राम साखरेचं पोतं । समुद्रावरी सेतु बांधाया काय काम, पुढे मारुति मागे राम गं । समुद्रावरी सेतु बांधोनी झाला जुना गं । टीप १ – एकादशी |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |