मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी मराठवाड्यात ४०० हून अधिक गावांमध्‍ये उपोषण चालू !

हिंगोली आणि नांदेड जिल्‍ह्यांतील १९१ गावांत पुढार्‍यांना प्रवेशबंदी !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत आहे. ८ पैकी ५ जिल्‍ह्यांमध्‍ये ४०० हून अधिक गावांत आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्‍या उपोषणाला पाठिंबा देत ग्रामस्‍थांनी उपोषण चालू केले आहे, तर हिंगोली आणि नांदेड जिल्‍ह्यांतील १९१ गावांत पुढार्‍यांना प्रवेशबंदी अन् निवडणुकीवर बहिष्‍कार घालण्‍याचा निर्णय ग्रामस्‍थांनी घेतला आहे. ग्रामस्‍थांनी तशी शपथ घेतली आहे, तसेच तालुकास्‍तरावर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण चालू करण्‍यात आले आहे.

परभणी जिल्‍ह्यात ५० गावांमध्‍ये सकल मराठा समाजाच्‍या वतीने साखळी उपोषण चालू करण्‍यात आले आहे. हिंगोली जिल्‍ह्यातील ५६३ गावांपैकी १०० हून अधिक गावांनी राजकीय नेत्‍यांना गावात प्रवेश बंदी केली. अनेक गावांतून आरक्षणाला पाठिंबा वाढत आहे. धाराशिव जिल्‍ह्यात १०० हून अधिक गावांमध्‍ये तरुणांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे.