चातुर्मासात अनेक व्रते, वैकल्ये, सण असतात. या सणांच्या माध्यमातून आपण जीवन सुसह्य होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अनेक घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. नातेवाईक, मित्रमंडळी यांसह एकत्र येऊन आनंदाचे काही क्षण घालवून पुन्हा आपले दैनंदिन जीवन चालू करत असतो. तसे पाहिले, तर हे चक्र अनेक वर्षे, अनेक पिढ्या आणि युगानुयुगे चालू आहे; परंतु आता सण-समारंभ म्हणजे ‘केवळ एकत्र येणे, मजा करणे किंवा एक दिवसाची सुटी’, अशी मानसिकता झाली आहे. ही मानसिकता धर्माचरण आणि धार्मिक विधी यांचे महत्त्व ठाऊक नसल्यामुळे झाली आहे.
याचे उत्तम उदाहरण नुकताच झालेला ‘पितृपक्ष’. ‘आज काल कोण एवढे करते ?’, ‘करायलाच हवे का ? एवढेच करूया ?’, ‘एवढा वेळ कुठे मिळणार ?’, असे विविध प्रश्न आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात. पितृपक्षाचे महत्त्व आणि त्या वेळी केल्या जाणार्या विधींचे शास्त्र सांगणारे धर्मशिक्षण हिंदूंच्या पुढील पिढीपर्यंत पोचले नसल्याचा हा परिणाम आहे. धर्मशास्त्रात सांगितलेल्या विविध कृती या अधिकाधिक प्रमाणात योग्य केल्या, तर त्याचा लाभ आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना होणार आहे. यासाठी धार्मिक कृतींचे लाभ सांगणारे धर्मशास्त्र जाणून घ्यायला हवे. कलियुगात धार्मिक कृती केल्या, तर त्याचा लाभ अनेक पटींनी होतो. आधीच्या पिढ्यांनी दिलेला हा धार्मिक वारसा यापुढेही असाच जतन करणे, हे आपल्या हातात आहे.
काळानुरूप धार्मिक कृती करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. यामध्ये उपलब्ध साहित्य, जागा, मनुष्यबळ आणि मुख्य म्हणजे वेळ इत्यादी हे सर्व मान्यच आहेे; पण यातूनही मार्ग काढून आपण अधिकाधिक धार्मिक कृती परिपूर्ण कशा करू शकतो ? याकडे लक्ष दिले पाहिजे. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तंतोतत करणे आपल्याला शक्य नसेल, तर आपण काय करू शकतो ? हे सुद्धा सांगितले आहे. अनेक विविध पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत, त्यानुसार आपण आपल्या क्षमतेप्रमाणे धार्मिक कृती करायला हव्यात. त्यामुळे ‘आज एवढे कोण करत आहे ?’, ही मानसिकता पालटूया. आपल्या धर्मात ‘कर्मफलसिद्धांत’ सांगितला आहे. ‘इतरांनी केले नाही म्हणून आपणही करायचे नाही’, हे अयोग्य आहे. आपण आपल्याला जसे आणि जेवढे जमेल तेवढे धर्माचरण करायला हवे. आपण जे आणि जसे करू ते अन् तसे आपल्या कर्माचे फळ हे आपल्यालाच भोगायला लागणार किंवा मिळणार आहे.
– सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी