मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी, २४ ऑक्टोबर (वार्ता.) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा राज्य सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आढावा बैठकीनंतर पर्वरी येथे एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडा सचिव स्वेतिका सच्चेन आणि पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत पुढील माहिती दिली.
नीरज चोप्रा यांच्यासमवेत कात्या कोएल्हो यादेखील स्पर्धेची ज्योत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपुर्द करणार !
भालाफेकमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकल्यामुळे ‘गोल्डन बॉय’ म्हणून प्रसिद्ध असलेले नीरज चोप्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रीडा स्पर्धेची ज्योत सुपुर्द करणार, असे ‘भारतीय ऑलिंपिक असोसिएशन’ने निश्चित केले आहे; मात्र यासाठी गोवा सरकारने गोव्यातील क्रीडापटू कात्या कोएल्हो यांचे नाव सुचवले आहे. यामुळे नीरज चोप्रा यांच्यासमवेत कात्या कोएल्हो यादेखील स्पर्धेची ज्योत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपुर्द करणार आहेत.
उद्घाटन सोहळ्याच्या खास निमंत्रण पत्रिकांचे आमदार आणि पंचायत यांच्यामार्फत वितरण !
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू मैदानात होणार्या उद्घाटन सोहळ्यासाठी खास निमंत्रण पत्रिका सिद्ध करण्यात आल्या आहेत. या निमंत्रण पत्रिकांचे आमदार आणि पंचायत यांच्यामार्फत वितरण केले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी दुपारी ४.३० पर्यंतच नागरिकांना प्रवेश असेल आणि त्यानंतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
कोलवा जंक्शन ते टायटन जंक्शन मार्ग अर्धा घंटा वाहतुकीस बंद !
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने काही ‘प्रोटोकॉल’ पाळावे लागणार आहेत. यामुळे वाहतुकीत पालट करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता कोलवा जंक्शन ते टायटन जंक्शन मार्ग अर्धा घंटा वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी वाहतुकीची वर्दळ होऊ नये, यासाठी दक्षिण गोव्यातील सरकारी कार्यालयांना अर्धा दिवस सुटी घोषित करण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळ्याला १२ सहस्र लोकांची उपस्थिती लाभणार !
उद्घाटन सोहळ्याला राज्यभरातून १२ सहस्र लोकांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये ५ सहस्र शालेय विद्यार्थी, तसेच स्पर्धेत सहभाग घेणारे खेळाडू आणि इतर पदाधिकारी यांचा समावेश असणार आहे.
६०० कलाकार पंतप्रधानांसमोर कला सादर करणार !
उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर ‘राष्ट्रीय एकात्मता’ विषयावर ६०० कलाकार पंतप्रधानांसमोर त्यांची कला सादर करणार आहेत. यामध्ये २०० गोमंतकीय कलाकार असतील. या वेळी हेमा सरदेसाई आणि सुखविंदर सिंह यांचाही खास कार्यक्रम होणार आहे.