अलीगड (उत्तरप्रदेश) – क्रिकेटपटू रिंकू सिंह यांनी जिल्ह्यातील कमालपूर गावात कुलदेवीचे मंदिर बांधले आहे. सिंह यांच्या कुटुंबाची कुलदेवता श्री चौदेरेदेवी आहे. इंडियन क्रिकेट लीग अर्थात् ‘आय.पी.एल्.’ आणि भारतीय क्रिकेट संघात खेळतांना चांगली कामगिरी व्हावी, यासाठी त्यांनी कुलदेवीकडे आशीर्वाद मागितले होते. त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी श्री चौदेरेदेवीचे मंदिर बांधले.
रिंकू सिंह यांनी ‘आय.पी.एल् २०२३’ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळतांना चांगला खेळ केला होता. गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांनी शेवटच्या षटकात ५ षटकार ठोकले होते. या डावात त्यांनी २१ चेंडूत ४८ धावा केल्या होत्या. आय.पी.एल्’मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे रिंकू सिंह यांना चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघात संधी मिळाली होती. या स्पर्धेतही त्यांनी चांगली कामगिरी केली होती आणि भारतीय संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता.