दसर्‍याला रावणाची प्रतिमा दहन करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्याची रावणप्रेमी ‘आदिवासी विकास परिषदे’ची मागणी !

नागपूर – दसर्‍याच्या दिवशी रावणाची प्रतिमा दहन करणारी व्यक्ती आणि मंडळ यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करावेत. ही प्रथा कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी मागणी ‘अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे’च्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी शाखा, तसेच ‘ऑल इंडिया आदिवासी पिपल्स फेडरेशन, नागपूर’ येथील तुमसर शाखेने भंडारा येथील पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन सामाजिक माध्यमांवरही प्रसारित झाले आहे. ही मागणी अमान्य केल्यास ‘आक्रोश मोर्चा’ काढण्याची चेतावणी या संघटनांनी दिली आहे.

या निवेदनात परिषदेने म्हटले आहे की,

१. रावण हा सर्वांना न्याय देणारा न्यायप्रिय राजा होता. (रावणाने अनेक ऋषी-मुनींची हत्या केली, तसेच स्त्रियांवर अत्याचार केले. असे असतांना त्याला न्यायप्रिय म्हणणे हास्यास्पय ! – संपादक) रावण हा विविध गुणांचा समुच्चय आहे. तो संगीततज्ञ, राजनीतीतज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य आणि विवेकवादी होता. इतके असतांनाही त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला आणि त्याच्या गुणांना अवमानित करणे चुकीचे आहे. (जगभरातील ओसामा बिन लादेनसह अनेक आतंकवादी हे उच्चशिक्षित आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे, म्हणजे त्यांच्या गुणांना अवमानित करणे’, असे परिषदेला वाटते का ? – संपादक)

२. इतिहासाचे विकृतीकरण करून रावणाला खलनायक ठरवण्यात आले आहे. प्रतिवर्षी दसर्‍याला रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जात. अशा राजाला व्यवस्थेने अपकीर्त करण्याची कोणतीही कसर ठेवली नाही. (इतिहासात रावणाने केलेल्या क्रौर्याचे वर्णन आहे. त्याचा रावणप्रेमींनी अभ्यास करावा ! – संपादक) वास्तविक रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही आणि यापुढेही होणार नाही. रावण दहनाची अनुमती कुणालाही देऊ नये.

संपादकीय भूमिका

असुराचा उदो उदो करणारे उद्या जिहादी आतंकवादी, धर्मांध, भ्रष्टाचारी यांचे उदात्तीकरण करायलाही मागे-पुढे पहाणार नाहीत ! त्यामुळे अशांचा वैचारिक प्रतिवाद करण्यासह त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !