सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…
‘नवरात्रीतील ‘नऊ’ या शब्दाला शक्ती उपासनेत फार महत्त्व आहे. ‘९’ हा अंक शक्तीचे स्वरूप आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांत आदिशक्ती म्हणजेच दुर्गेच्या नवदुर्गांची उपासना केली जाते. या नवदुर्गांच्या रूपांची थोडक्यात माहिती येथे देत आहोत.
१. शैलपुत्री
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम् ।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ।।
अर्थ : इच्छापूर्ती करणार्या, मस्तकावर अर्धचंद्र धारण करणार्या, बैलावर आरूढ असणार्या, त्रिशूल धारण करणार्या, शैलपुत्री, यशस्विनी अशा देवीला मी वंदन करतो.
आश्विन शुक्ल प्रतिप्रदा हा नवरात्रातील पहिला दिवस. या दिवशी दुर्गेच्या पहिल्या रूपाची, म्हणजे शैलपुत्री या देवीची उपासना केली जाते. ही सर्वशक्तीमान असून हिचा जन्म हिमालय पर्वताच्या पोटी झाला. म्हणून तिला ‘शैलपुत्री’ म्हणतात. सुंदर रूप असणार्या या देवीने उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ धारण केलेले असून ती वृषभावर (बैलावर) आरूढ झालेली आहे.
२. ब्रह्मचारिणी
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू ।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ।।
अर्थ : जिने आपल्या दोन करकमलांमध्ये रुद्राक्षाची माळ आणि कमंडलू धारण केले आहे, अशी श्रेष्ठ देवी ब्रह्मचारिणी माझ्यावर प्रसन्न होवो.
आश्विन शुक्ल द्वितीया नवरात्रातील दुसरा दिवस. या दिवशी दुर्गेच्या दुसर्या रूपाची, म्हणजे ब्रह्मचारिणी या देवीची उपासना केली जाते. नारदमुनींच्या उपदेशाप्रमाणे घोर तपश्चर्या केली; म्हणून तिला तपश्चारिणी, म्हणजेच ‘ब्रह्मचारिणी’ असे म्हणतात. या देवीने उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू धारण केले आहे. हिची उपासना केल्याने मानवामध्ये तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयम या दैवी गुणांची वाढ होते.
३. चंद्रघंटा
पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता ।
प्रसादं तनुते मह्यं चन्द्रघण्टेति विश्रुता ।।
अर्थ : सिंहावर (पिण्डजप्रवर) आरूढ आणि भयंकर शस्त्रांनी सज्ज असलेली चंद्रघंटा या नावाने प्रसिद्ध असलेली देवी माझ्यावर कृपा करो.
आश्विन शुक्ल तृतीया नवरात्रातील तिसरा दिवस. या दिवशी दुर्गेच्या तिसर्या रूपाची, म्हणजे चंद्रघंटा या देवीची उपासना केली जाते. शांतीदायक आणि कल्याणकारी असे हे दुर्गेचे स्वरूप आहे. मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र धारण करणारी, सुवर्णकांती असणारी ही देवी दशभुजाधारिणी आहे. या देवीने तिच्या हातात तलवार, बाण, धनुष्य, कमंडलू, फूल, गदा आणि त्रिशूळ धारण केले आहे.
४. कुष्मांडा
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च ।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे ।।
अर्थ : मदिरेने भरलेला आणि रक्ताने माखलेला कलश ज्या भगवतीदेवीने आपल्या दोन्ही करकमलांमध्ये धारण केला आहे, अशी श्री कुष्मांडामाता माझे कल्याण करो.
आश्विन शुक्ल चतुर्थी नवरात्रातील चौथा दिवस. या दिवशी दुर्गेच्या चौथ्या रूपाची, म्हणजे कुष्मांडा या देवीची उपासना केली जाते. हिच्या उपासनेने सर्व प्रकारच्या आधिव्याधींचा नाश होतो, अशी मान्यता आहे. ती आपल्या मंद स्मितहास्याने ब्रह्मांड उत्पन्न करते; म्हणून तिला ‘कुष्मांडा’ असे म्हणतात. ही देवी अष्टभुजाधारिणी आहे. या देवीने तिच्या हातात कमंडलू, धनुष्य बाण, कमळ, अमृत कलश, चक्र, गदा, सिद्धी आणि निधी प्रदान करणारी माळ धारण केली आहे.
५. स्कंदमाता
सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ।।
अर्थ : सिंहावर आरूढ असलेली, दोन्ही हातांमध्ये कमळ धारण केलेली यशस्विनी देवी स्कंदमाता माझे कल्याण करणारी होवो.
आश्विन शुक्ल पंचमी नवरात्रातील पाचवा दिवस. या दिवशी दुर्गेच्या पाचव्या रूपाची, म्हणजे स्कंदमाता या देवीची उपासना केली जाते. ही सूर्यमंडळातील एकमेव देवी आहे. हिच्या मांडीवर कार्तिकस्वामी विराजमान झाले आहेत. ही देवी चतुर्भूज असून हिच्या दोन हातात कमळ, तिसर्या हातात अभयमुद्रा आणि एका हाताने कार्तिकस्वामींना धरले आहे. सिंह हे तिचे वाहन आहे.
६. कात्यायनी
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना ।
कात्यायनी शुभं दद्यादेवी दानवघातिनी ।।
अर्थ : चंद्राप्रमाणे तेजस्वी, सिंहावर आरूढ झालेली आणि दानवांचा नाश करणारी देवी कात्यायनी आमचे कल्याण करो.
आश्विन शुक्ल षष्ठी नवरात्रातील सहावा दिवस. या दिवशी दुर्गेच्या सहाव्या रूपाची, म्हणजे कात्यायनी या देवीची उपासना केली जाते. या देवीच्या उपासकाला तात्काळ फळ मिळते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या ४ पुरुषार्थांची प्राप्ती हिच्या साधनेने होते. महर्षि कात्यायन यांची कन्या म्हणून कात्यायनी ! हिने आश्विन शुक्ल दशमीला महिषासुराचा वध केला. सुवर्णासम तेजस्वी वर्ण असलेली ही देवी चतुर्भुज असून हिच्या हातात तलवार आणि कमळ, उर्वरित दोन हातांची अभयमुद्रा अन् वरमुद्रा आहे.
७. कालरात्री
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरस्थिता ।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी ।।
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा ।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी ।।
अर्थ : केस मोकळे सोडलेली, कानात आभूषणे धारण करणारी, नग्न, गाढवावर आरूढ, लांब जिव्हा आणि कान असलेली, तेलाने लिप्त असे चकाकणारे शरीर असलेली, डाव्या पायात विजेप्रमाणे काटेरी अलंकार धारण करणारी, हातात ध्वज (अभयमुद्रा) घेतलेली, भयंकर रात्रीप्रमाणे काळा रंग असलेली असे देवी कालरात्रीचे रूप आहे.
आश्विन शुक्ल सप्तमी नवरात्रातील सातवा दिवस. या दिवशी दुर्गेच्या सातव्या रूपाची म्हणजे कालरात्री या देवीची उपासना केली जाते. ही शुभ फळ देणारी आणि अनिष्ट ग्रहपिडा दूर करते. ही काळ्याकुट्ट वर्णाची असून हिचे केस राठ आणि अस्ताव्यस्त आहेत. ही त्रिनेत्रधारिणी असून हिच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाला निघतात. ही देवी चतुर्भूज असून हिच्या वरच्या डाव्या हातात कट्यार आणि दोन्ही उजव्या हाताची अभय अन् वरमुद्रा आहे. हिचे वाहन गर्दभ म्हणजेच गाढव आहे.
८. महागौरी
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः ।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ।।
अर्थ : शुभ्र बैलावर आरूढ असलेली, पवित्र शुभ्र वस्त्र परिधान करणारी, भगवान शंकरांना आनंद देणारी महागौरी मला कल्याण प्रदान करो.
आश्विन शुक्ल अष्टमी नवरात्रीतील आठवा दिवस. या दिवशी दुर्गेच्या आठव्या रूपाची, म्हणजे महागौरी या देवीची पूजा उपासना केली जाते. हिच्या उपासनेने पापमुक्त होऊन अक्षय पुण्य प्राप्त होते. भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी पार्वतीच्या रूपात घोर तप केल्याने हिचे संपूर्ण शरीर काळे पडले. भगवान शंकरांनी तिला पवित्र गंगाजलाने स्नान घातले, तेव्हा तिला गौरवर्ण प्राप्त झाला, म्हणून तिला ‘महागौरी’ म्हटले जाऊ लागले. तिने शुभ्र वस्त्र आणि आभूषणे धारण केलेली आहे. वृषभावर आरूढ झालेली ही चतुर्भूज असून हिच्या वरच्या उजव्या हातात त्रिशूल, खालच्या उजव्या हाताची वरमुद्रा, वरचा डावा हात अभयमुद्रा धारण केलेला असून खालच्या डाव्या हातात डमरू आहे.
९. सिद्धिदात्री
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धीदायिनी ।।
अर्थ : सिद्ध, गंधर्व, यक्ष, असुर, देव आदी सर्वांकडून जिची सेवा केली जाते, अशी हे सिद्धिदात्री देवी, तू आम्हाला नेहमी सिद्धी देणारी हो.
आश्विन शुक्ल नवमी नवरात्रातील नववा दिवस. या दिवशी दुर्गेच्या नवव्या रूपाची, म्हणजे सिद्धिदात्री या देवीची उपासना केली जाते. हिच्या उपासनेने साधकास अष्टसिद्धी प्राप्त होतात. कमळावर विराजमान असलेली ही देवी चतुर्भूज आहे.
या ९ दिवसांनंतरचा १० वा दिवस, म्हणजे ‘विजयादशमी’ आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक प्रमुख मुहूर्त !’
– मंगेश मोडे
(साभार : मासिक ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, गुरुपौर्णिमा विशेषांक २०१५)