Parva : ‘महाभारत हा इतिहास आहे कि पौराणिक कथा’ या विषयावर ‘पर्व’ हा आगामी चित्रपट टाकणार प्रकाश !

  • महान इतिहासकार पद्मभूषण डॉ. एस्.एल्. भैरप्पा लिखित पुस्तकावर आधारित  चित्रपट !

  • दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ‘एक्स’वरून प्रसारित केला माहितीचा व्हिडिओ !

दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री

मुंबई – ‘महाभारत हा इतिहास आहे कि पौराणिक कथा’ या विषयावर प्रकाश टाकणारा ‘पर्व : अ‍ॅन एपिक टेल ऑफ धर्मा’ (पर्व : धर्माची एक महाकथा) नावाचा चित्रपट बनवण्यात येणार आहे. चित्रपट ३ भागांत बनवण्यात येत असून महान इतिहासकार पद्मभूषण डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांनी लिहिलेल्या ‘पर्व’ पुस्तकावर आधारित आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून दिली. पल्लवी जोशी या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

या चित्रपटाचा एक मिनिटाचा व्हिडिओही अग्निहोत्री यांनी प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये अग्निहोत्री सांगतात, ‘महाभारत केवळ एक महाकाव्य आहे कि भारताचा आत्मा ? शतकानुशतके महाभारत हा इतिहास आहे कि केवळ एक पौराणिक कथा ?, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. १७ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त इतिहासकार पद्मभूषण डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांनी ‘पर्व – युद्ध, शांती, प्रेम, मृत्यू, भगवंत आणि मनुष्य’ नावाचा एक ग्रंथ लिहिला. काहीतरी कारण निश्‍चित असेल की, ज्यामुळे या पुस्तकाला ‘मास्टरपीस ऑफ मास्टरपीसेस’ (उत्कृष्टांतील उत्कृष्ट) म्हटले जात असेल. या पुस्तकाचे संस्कृतसहित अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले. याखेरीज इंग्रजी, मॅन्डेरिन, चिनी आणि रशियन या भाषांतही हे पुस्तक प्रकाशित झाले. प्रत्येक भाषेतील हे पुस्तक ‘बेस्टसेलर’ (पुस्तकाचा प्रचंड खप झाला) राहिले. या पुस्तकावर आधारित ‘पर्व’ चित्रपट ३ भागांत प्रदर्शित होईल.’

संपादकीय भूमिका

  • गेल्या २०० वर्षांत आधी ब्रिटिशांनी आणि नंतर काँग्रेस अन् साम्यवादी यांनी भारतीय इतिहासाला छिन्नविछिन्न करून टाकले. त्यामुळेच भारताच्या वास्तविक इतिहासाचे पुनर्लेखन अत्यावश्यक आहे. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उचललेले हे पाऊल अभिनंदनीयच आहे !