Global Hunger Index 2023 : जागतिक उपासमार निर्देशांक जाणूनबुजून भारतातील खरी परिस्थिती दाखवत नाही !

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी खडेबोल सुनावले !

जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची १११ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

नवी देहली – काही निर्देशांक जाणूनबुजून भारतातील खरी परिस्थिती दाखवत नाहीत. याचे उदाहरण म्हणजे जागतिक उपासमार निर्देशांक. यांचे लोक भारतात १४० कोटी लोकसंख्येपैकी ३ सहस्र लोकांना दूरभाष करून विचारतात, ‘तुम्ही उपाशी आहात का ?’ त्यावरून ते हे निर्देशांक बनवतात. या निर्देशांकानुसार पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा चांगली स्थिती आहे म्हणे ! हे शक्य आहे का ?, असे खडेबोल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुनावले. जागतिक उपासमार निर्देशांकात १२५ देशांच्या सूचीत भारताची १०७ वरून १११ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. यावरून इराणी यांनी या निर्देशांकाच्या विश्‍वासार्हतेवर २० ऑक्टोबर या दिवशी भाग्यनगर येथील एका कार्यक्रमात वरील प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

यावर काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनते यांनी आक्षेप नोंदवत म्हटले की, मला हे कळत नाही की, अधिक लाजिरवाणे काय आहे ? तुम्ही जनतेकडे केलेला दुर्लक्ष कि दाखवलेली असंवेदनशीलता ? तुम्हाला खरेच असे वाटते की, जागतिक उपासमार निर्देशांक केवळ लोकांना दूरभाष करून ते उपाशी आहेत का ? हा प्रश्‍न विचारून तयार केला जातो ? तुम्ही देशाच्या मंत्री आहात. तुमच्याकडून हे ऐकणे दुर्दैवी आहे ! (जर या निर्देशांकावर विश्‍वास ठेवायचा झाला, तर गेल्या ७६ वर्षांत भारताची उपासमारीच्या संदर्भातील ही दुर्दशा देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसमुळेच झाली आहे. यावर श्रीनते गप्प का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

हे जर खरे असेल, तर असे सर्वेक्षण करणार्‍या जागतिक आस्थापनांच्या विरोधात जागतिक व्यासपिठावर आवाज उठवून त्यांचे भारतद्वेष्टे स्वरूप उघड करणे आवश्यक !