भारताने इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातून काय शिकावे ?

 इस्रायल आणि गाझा पट्टीतील ‘हमास’ आतंकवादी संघटना यांच्यात सध्या युद्ध चालू आहे. त्याच्या अनेक बातम्या प्रतिदिन येत आहेत आणि त्यावरून आपल्याला या युद्धाची भीषणता लक्षात येत आहे. या सर्व परिस्थितीत ‘भारताने इस्रायलकडून काय शिकावे ?’, याविषयी ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी केलेले विश्लेषण येथे देत आहोत.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

१. इस्रायलची सर्वच स्तरांवरील लढवय्या वृत्ती न्यून !

हमासने अत्यंत जुन्या पद्धतीने इस्रायलच्या सीमेवरील कुंपण ट्रॅक्टर, हँड ग्रेनेड आणि अन्य वस्तू यांचा वापर करून फोडले. अशा प्रकारे कुंपण तोडले जाईल, याची इस्रायलनेही अपेक्षा केली नव्हती. त्या कुंपणापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर युवकांचा कार्यक्रम चालू होता. एवढ्या जवळ आक्रमण होत असूनही त्यांना ते होत असल्याचे कळले नाही, हे आश्चर्यजनक आहे. या कार्यक्रमात ४ सहस्रांहून अधिक युवक होते, तर आक्रमण  करणारे आतंकवादी १५ हून अधिक होते. असे असूनही ते युवक आतंकवाद्यांशी लढू शकले नाहीत; कारण इस्रायलसुद्धा आता ‘सॉफ्ट कंट्री’ (मवाळ देश) बनत आहे. शहरीकरण वाढले की, लढाऊ वृत्ती न्यून होते. लोकांना पांढरपेशी नोकर्‍या हव्या असतात. त्यामुळे लढाई करण्याचे धाडस गायब होते. ४ सहस्र युवकांना लढता आले नसते का ? या संदर्भात १०-१५ वर्षांपूर्वी भारतात घडलेली एक घटना आठवते. भारतात आलेल्या ३-४ इस्रायली पर्यटकांना आतंकवाद्यांनी पकडले होते. तेव्हा त्या आतंकवाद्यांना मारून हे इस्रायली पळून आले होते. ती लढवय्या वृत्ती न्यून झालेली दिसते. एकूणच या आतंकवादी आक्रमणाचा प्रतिकार पुष्कळ न्यून गतीने झाला. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा, सरकार आणि प्रशासन या सर्वच स्तरांवरील लढवय्या वृत्ती न्यून दिसून आली.

२. इस्रायलमधील अंतर्गत वादाचा हमासला लाभ !

एखाद्या देशातील परिस्थिती नाजूक असते, तेव्हा आक्रमण केले की, पुष्कळ हानी होते. इस्रायलमध्ये गेल्या २ वर्षांत ४ वेगवेगळी सरकारे स्थापन झाली. इस्रायलचे लष्कर, समाज, न्यायव्यवस्था, राजकीय नेते यांत मतभेद निर्माण झाले आहेत. ते एकमेकांमध्ये अंतर्गत वादांमध्ये गुंतले आहेत. ज्या वेळी अशा प्रकारे स्थिती निर्माण होते, त्या वेळी शत्रूवरील लक्ष न्यून होते. असे वातावरण इस्रायलमध्ये असल्यामुळे हमासने याचा लाभ घेतला. आक्रमण झाल्यानंतर जेव्हा नवे सरकार स्थापन झाले, तेव्हा ते सगळे मतभेद विसरून एकत्र आले. अत्यंत कठोर प्रतिआक्रमण केले गेले. इस्रायलच्या प्रत्युत्तराची तीव्रता प्रचंड होती, यात शंकाच नाही !

३. हमासने केलेली युद्धसिद्धता !

प्रतिआक्रमण करतांना ‘लक्ष्य’ (टार्गेट) ठरवावे लागते. इस्रायलला ते ठरवता आले नाही; कारण गाझामध्ये अनेक नागरिकही रहात होते. गाझामधील इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर नागरिक, तर खालच्या मजल्यांवर आतंकवादी रहातात. त्यामुळे इस्रायलला ‘लक्ष्य’ ठरवता आले नाही. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांचाही या युद्धात मृत्यू झाला. हा सुद्धा हमासच्या डावपेचांचा एक भाग आहे. हमासने गेल्या ९-१० वर्षांत भूमीच्या खाली भुयारे बनवली आहेत. ती भुयारे ५०० किलोमीटर लांब आहेत. या भुयारांवर सामान्य शस्त्रांचा काही परिणाम होत नाही; कारण ती भूमीखाली २५ ते ३० मीटर खोलीवर आहेत. त्यामुळे इस्रायल भूमीवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे.

४. युद्ध कधी थांबेल ?

हमासच्या बाजूने शिया इस्लामी राष्ट्रे आहेत. त्यांचा विचार करायचा झाल्यास सीरिया आणि जॉर्डन यांची शक्ती पुष्कळ नाही. लेबेनॉनमध्ये ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी गटाची शक्ती हमासपेक्षा पुष्कळ अधिक आहे. त्यामुळेही अमेरिकेने या देशांना शह देण्यासाठी इस्रायलला शस्त्रास्त्रे पाठवली आहेत. अमेरिकेने ही इस्लामी देशांना दिलेली चेतावणी आहे. रशियाकडे सध्या साहाय्य करण्यासाठी काही नाही आणि चीनला या विषयात पडायचे नाही. सगळीकडे शांततेच्या चर्चा चालू आहेत; पण सध्याची परिस्थिती पहाता जोपर्यंत एका गटाचा पाडाव होत नाही किंवा त्यांची शक्ती न्यून होत नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही.

इस्रायलने केलेल्या आक्रमणात उद्ध्वस्त झालेली इमारत

५. भारताने काय शिकावे ?

अ. चीन, पाकिस्तान, नक्षलवादी, बांगलादेशी घुसखोर हे भारताचे शत्रू प्रत्येक वेळी आपल्यावर आक्रमण करण्यासाठी आधुनिक पद्धत वापरतील. भारतात प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता अल्प आहे. भारतात हिंसक आंदोलने आणि घातपाताचा जिहाद होईल. वेगवेगळ्या कारणाने आंदोलने, रस्ते बंद करणे, रेल्वेचे घातपात घडवून आणणे, अशी माध्यमे भारतात वापरली जातील.

आ. आता तंत्रज्ञान पुष्कळ पुढे गेले आहे. इस्रायलचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर त्यांच्याकडे क्षेपणास्त्रे हवेत नष्ट करणारे ‘आयर्न डोम’ (क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा) होते; पण ते वेळेत चालले नाही. भारताकडेही असे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठीही माणूसच लागतो. ती व्यक्ती कमी पडून चालत नाही. तिचे प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. पुण्यातच बघितले, तर सहस्रो ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवलेले आहेत. चोरी किंवा अन्य प्रकरणामध्ये त्यांचा वापर किती प्रमाणात होतो ?

इ. नेहमीच शस्त्राला प्रतिआक्रमण करणारे शस्त्र बनवले जातेच. क्षेपणास्त्र बनवले, तर ते नष्ट करणारे अधिक क्षमतेचे क्षेपणास्त्र बनवले जाते. असे सतत घडत असते. तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. त्यापैकी आपल्या शत्रूविरुद्ध कोणते तंत्रज्ञान वापरायचे आहे ? ते आपण निश्चित केले पाहिजे.

वर्ष २०२२ मध्ये पाकने पंजाबमध्ये २८८ वेळा ड्रोन पाठवून १५ ते १६ सहस्र किलो चरस, अफू, गांजा पाठवला. पाकच्या या ‘ड्रोन युद्धा’ला भारताने अपेक्षित प्रत्युत्तर दिले नाही. आपण प्रत्युत्तर देऊ शकलो नाही, हे भारतीय यंत्रणांचे अपयश आहे.

ई. जेव्हा देशात पुष्कळ काळ शांतता असते, तेव्हा कुणीच सतर्क नसतो. वास्तवातही नागरिक, सैन्य दले असे कुणीच २४ घंटे सतर्क राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. शांतता काळातही सतत सतर्क कसे रहायचे ? हे बघितले पाहिजे.

उ. आता पाकिस्तान पारंपरिक युद्ध करणार नाही; कारण त्याने आक्रमण केले, तर आपण (भारत) ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू, हे त्यालाही माहिती आहे. त्यामुळेच पाककडून भारतात सहस्रो किलो अमली पदार्थ पाठवले जात आहेत. पाककडून बनावट नोटा भारतात पाठवल्या जात आहेत. बांगलादेशी घुसखोरी वाढत आहे. ही युद्धाची पालटती आव्हाने आहेत. त्याचा सामना कसा करावा, हे ठरवले पाहिजे.

ऊ. सामाजिक माध्यमांच्या वापरावरही नियंत्रण आणायला हवे. सोशल मीडिया, फेसबुक यांच्यावरील लिखाणामुळे दंगली होत आहेत. त्यासाठी माझे असे मत आहे की, सामाजिक माध्यमांवरील खाती नोंदवण्यासाठी त्याला आधारकार्ड बंधनकारक करणे आवश्यक आहे, तरच खोटी खाती उघडून केल्या जाणार्‍या देशद्रोही, प्रक्षोभक लिखाणावर मर्यादा येईल.

ए. आपत्तीच्या काळात कसे वागायचे, याचे सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण देणे आवश्यक आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (१५.१०.२०२३)