साधकांनो, गुरुकृपेने मिळालेल्या सेवेच्या प्रत्येक संधीचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेऊन जीवनाचे सार्थक करा !

‘जेव्हा एखाद्या साधकाला गुरुकार्यामध्ये सहभागी होऊन सेवा करण्याची सुवर्णसंधी लाभते, तेव्हा त्यामागे अनेक कारणे असू शकतात. ती पुढे दिली आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. त्या साधकामध्ये ती सेवा करण्यासाठीचे कौशल्य आणि सेवेप्रतीची तळमळ असणे

२. साधकाची स्वतःची या जन्मातील आणि पूर्वजन्मातील साधना असणे

३. साधकाचे आई-वडील, पूर्वज आणि कुळामधील अनेक जण यांनी केलेल्या साधनेमुळे साधकाला सेवेची संधी मिळणे

४. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे गुरुकृपा असणे

‘कलियुगात गुरूंच्या ईश्वरी कार्यात सेवा करण्याची संधी लाभणे’, हे अतिशय दुर्मिळ आणि भाग्याचे आहे. त्यामुळे कोणतीही सेवा करण्याची संधी मिळाली, तर मागचा-पुढचा कोणताही विचार न करता ती सेवा पूर्ण करण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. एक सेवा करत असतांना दुसरी सेवा आली, तर उत्तरदायी साधकांना विचारून प्राधान्यानुसार सेवा पूर्ण करावी. जर आपण आपल्या अयोग्य क्रियमाणाने एखादी सेवा सोडून दिली, तर ‘ती पुन्हा केव्हा मिळेल ?’, याची शाश्वती नसते.

असे ऐकले होते, ‘संत तुकाराम महाराज यांचा जन्म ज्या कुळात झाला, त्या कुळातील २१ पिढ्यांमध्ये होऊन गेलेल्या पूर्वजांच्या एकूण साधनेचे फळ, म्हणजे संत तुकाराम यांच्यासारख्या महान संतांचा जन्म त्या कुळात होणे.’ यातून शिकायला मिळते, ‘आपल्याला मिळालेल्या सेवेच्या मागे कित्येक जणांची साधना कारणी लागलेली असते. अशा स्थितीत आपण चुकून किंवा मुद्दाम जरी एखादी सेवा नाकारली, तरी आपल्याला ज्या पूर्वजांच्या कठोर साधनेमुळे ती सेवा लाभली आहे, त्या सर्वांच्या साधनेवर कोणताही विचार न करता एकप्रकारे पाणी फेरल्यासारखेच आहे.’

साधकाने ‘प्रत्येक सेवा मला देवाच्या कृपेने लाभली आहे. ही सेवा करण्याचे भाग्य देवाने मला दिले आहे. त्यामुळे भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा होण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत’, याची जाणीव सतत ठेवावी.

एकदा एका साधकाला एका संतांनी एक सेवा सांगितली होती. काही कारणांमुळे त्या साधकाने ती सेवा केली नाही. याचा परिणाम असा झाला की, त्या साधकाला पुढे तब्बल २ वर्षे कोणतीही सेवा मिळाली नाही, तसेच या काळात तो साधनेपासूनही दूर गेला. हे सर्व आपोआपच घडले. हे त्या साधकाच्या नंतर लक्षात आले. तेव्हा यामागील शास्त्र सांगतांना ते संत म्हणाले, ‘‘तुम्हाला सेवा न देण्याविषयी माझ्या मनात कोणताच विचार नव्हता. मी ते विसरूनही गेलो होतो; पण भगवंत ते स्मरणात ठेवतो. तुम्ही केलेले पुण्य आणि तुमची साधना यांमुळे तुम्हाला त्या वेळी सेवेची संधी चालून आली होती; पण अयोग्य क्रियमाण आणि मायेतील आकर्षण यांमुळे तुमच्याकडून ती सेवा न झाल्याने देवाने शिक्षा म्हणून ‘तुम्हाला पुढील २ वर्षे संतांकडून कोणतीही सेवा मिळणार नाही’, अशी परिस्थिती निर्माण केली. नंतरच्या काळात तुमची साधना वाढल्यामुळे देवाच्या कृपेने ती चूक तुमच्या लक्षात आली. त्यामुळे दिसतांना जरी सेवा छोट्या-मोठ्या दिसल्या, तरी त्यांमागील शास्त्र लक्षात आले नाही, तर साधनेची मोठी हानी होऊ शकते; म्हणूनच प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘दिसेल ते कर्तव्य’, हे वचन स्मरणात ठेवून सेवेच्या संधीचा साधनेसाठी वेळीच लाभ करून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक साधकाने सेवा भावपूर्ण करून मिळालेल्या संधीचा लाभ करून घेतला पाहिजे, तरच त्याचे कल्याण होते; नाहीतर ‘आयुष्यात परत ती संधी येईल कि नाही ?’, हे सांगता येत नाही; कारण आता आपत्काळाला आरंभ झाला आहे.’’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१.५.२०२०)