देवरुख येथील आध्यात्मिक गुरु  श्री. अजित तेलंग (वय ७१ वर्षे) स्वामीचरणी विलीन

श्री. अजित तेलंग

रत्नागिरी – देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकि मास्टर’ आणि ‘रेकि विद्यानिकेतन’चे संस्थापक तथा ओझरे येथील ‘ब्रह्मकमळ आश्रमा’चे संस्थापक श्री. अजित तेलंग (वय ७१ वर्षे) पुणे येथे १६ ऑक्टोबरला स्वामीचरणी विलीन झाले.

उच्च विद्याविभूषित श्री. अजित तेलंग यांनी प्रारंभी अनेक ‘कॉर्पोरेट’ आस्थापनांमध्ये नोकरी केली होती. त्यांनी स्वतःचे मार्केट रिसर्च आस्थापन स्थापन केले. व्यवसायात अग्रगण्य कामगिरी करत असतांना २५ वर्षांपूर्वी श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून आध्यात्मिक मार्गावर चालायचे त्यांनी ठरवले. ‘रेकि’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विद्येचा प्रचार आणि प्रसार करण्यात तेलंग यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य खर्च केले. जगभरात त्यांचे ४० सहस्रांहून अधिक विद्यार्थी आहेत.

भारत शासनाच्या ‘आयुषमान भारत’ या प्रकल्पांअंतर्गत श्री. अजित तेलंग यांनी गुजरात येथे रेकि विद्यानिकेतनद्वारे १ सहस्र ६०० हून अधिक वैद्यकीय अधिकार्‍यांना रेकिचे प्रशिक्षण दिले. भारतात १६ ठिकाणी, तर अमेरिकेत ८ ठिकाणी रेकि प्रशिक्षणाची केंद्रे स्थापन केली. त्यांनी आध्यात्मिक विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली. १५ ऑक्टोबर या दिवशी २ दिवसांचा ‘सेमिनार’ पूर्ण झाल्यानंतर रात्री १२.३० च्या सुमारास श्री. अजित तेलंग स्वामीचरणी विलीन झाले.  श्री. अजित तेलंग यांनी १० ऑक्टोबर २०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली होती.