शिक्षक न मिळाल्यास शाळा बंद आंदोलन करण्याची चेतावणी
मालवण : तालुक्यातील मसुरे केंद्र शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे, असा आरोप करत शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन अधिकार्यांना खडसावले. ‘जोपर्यंत शिक्षकांची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कार्यालयातच थांबू, तसेच १७ ऑक्टोबरपासून ‘शाळा बंद’ आंदोलन करू, अशी चेतावणी दिली. त्यानंतर गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी शाळेत १७ ऑक्टोबरपासून शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
मसुरे केंद्र शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत आणि एकूण ८२ पटसंख्या आहे. या शाळेत शिक्षकांची ५ पदे संमत आहेत. यातील २ पदे रिक्त आहेत. १ शिक्षक आजारी असल्यामुळे ते सुटीवर आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत केवळ २ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे २ शिक्षकांवर कामाचा ताण येत आहे आणि विद्यार्थ्यांचीही शैक्षणिक हानी होत आहे. अधिकार्यांकडून या समस्येविषयी योग्य प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप करत ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी मसुरे गावच्या माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण पंचायत समितीमध्ये जाऊन गट शिक्षणाधिकारी संजय माने आणि गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांची भेट घेऊन शिक्षकांची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली.
संपादकीय भूमिकाप्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, हे पुन्हा स्पष्ट ! |