उत्तर कोरियाकडून रशियाला १ सहस्र कंटेनर भरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांचा पुरवठा ! – अमेरिका

वॉशिंग्टन (अमेरिका) – युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये संघर्ष चालू असतांनाच अमेरिकेने एक मोठा दावा केला आहे. व्हाईट हाऊसने म्हटले की, उत्तर कोरियाने रशियाला १ सहस्रहून अधिक कंटेनर भरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोचवला आहे. ७ सप्टेंबर या दिवशी उत्तर कोरियातील नाजिन बंदरावरून निघालेले जहाज १ ऑक्टोबर या दिवशी रशियाच्या डुने बंदरावर पोचले. काही आठवड्यांपूर्वीच उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन रशियाच्या दौर्‍यावर गेले होते. या वेळी दोन्ही देशांमध्ये या दृष्टीने करार झालेला असू शकतो, असे अमेरिकेने म्हटले. अमेरिकेने शस्त्रास्त्रांनी भरलेल्या जहाजाच्या वाहतुकीची छायाचित्रेही प्रसारित केली आहेत.

सौजन्य WGN न्यूज 

१. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, उत्तर कोरियाने त्याच्या परमाणु कार्यक्रमाला बळ मिळावे, यासाठी रशियाला शस्त्रास्त्रे पुरवून त्या बदल्यात रशियाकडून शस्त्रास्त्रे निर्मितीच्या तंत्रज्ञानाची मागणी केली असू शकते.

२. याआधी अमेरिकेने ‘उत्तर कोरिया रशियाला दारूगोळा, तोफा आणि रॉकेट उपलब्ध करत आहे’, असा आरोप केला होता.

३. अमेरिकी अधिकार्‍यांनी म्हटले की, लवकरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यात शस्त्रास्त्रांचा करार होऊ शकतो. दोघे नेते रशियातील व्लादिवोस्तोक येथे भेटू शकतात. साधारणपणे देश सोडून न जाणारे किम जोंग उन या करारासाठी उत्सुक असल्याने ते रशियाला पुन्हा भेट देणार आहेत.

४. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले होते की, रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यात वाढत असलेले सहकार्य संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन करू शकते.

संपादकीय भूमिका 

अमेरिका नेतृत्व करत असलेल्या ‘नाटो’ने युक्रेनला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रांचे साहाय्य केले. दुसरीकडे रशियावर निर्बंध लादले. या सर्वांचाच परिपाक म्हणून रशिया धोकादायक उत्तर कोरियाचे साहाय्य घेत आहे, यात काय आश्‍चर्य !