सोलापूर – लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे २२ वर्षे वास्तव्य होते. भक्तांना त्यांच्या दिव्य दर्शनाचा लाभ व्हावा, यासाठी अक्कलकोट येथील राममंदिर परिसरातील २० एकरच्या परिसरात १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांचे भव्य मूर्ती शिल्प साकारण्यात येणार आहे. यासाठी अनुमाने १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार श्री. भगवान रामपुरे हेही उपस्थित होते.
श्री. भगवान रामपुरे यांची संकल्पना आणि मार्गदर्शन यांतूनच या शिल्पसृष्टीचे निर्माण केले जाणार आहे. यात स्वामी समर्थांच्या अवतार कार्यातील निवडक ५० प्रसंग मूर्ती स्वरूपात दाखवले जातील. दोन टप्प्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार असून पुढील ५ वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.