सिंधदुर्ग : दोडामार्ग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर !

गढूळ पाणीपुरवठ्यामुळे महिला संतप्त

नगरपंचायतीवर मोर्चा काढणार्‍या महिला

दोडामार्ग : दोडामार्ग शहराला पुरवठा होणारा गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. स्वच्छ पाण्यासाठी २ दिवसांपूर्वी नगरपंचायतीवर मोर्चा काढणार्‍या महिलांनी आता ‘नगरपंचायतीवर निघणार्‍या घागर मोर्च्याला सामारे जाण्याची सिद्धता ठेवावी’, अशी चेतावणी येथील नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकारी यांना दिली आहे.

पाणीप्रश्नी नगरपंचायतीला महिलांची चेतावणी (चित्र सौजन्य : सिंधुदुर्ग 24 तास)

दोडामार्ग शहराला मागील २-३ मासांपासून गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (२-३ मास शहरातील लोकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असण्याला उत्तरदायी कोण ? अशांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) याच्या विरोधात प्रभाग क्रमांक १ आणि २ येथील महिलांनी गढूळ पाणी घेऊनच नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ‘हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे’, असा आरोप केला होता. त्यामुळे गढूळ पाणी पुरवठ्यावरून दोडामार्ग शहरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले; मात्र आंदोलनानंतरही दूषित पाण्याचा पुरवठा कायम असल्याने संतापलेल्या आंदोलनकर्त्या महिलांनी ८ ऑक्टोबर या दिवशी येथील राष्ट्रोळी मंदिरात पत्रकार परिषद घेतली.

या वेळी महिलांनी सांगितले की, आम्ही सर्वसामान्य गृहिणी आहोत. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे पाण्यावरून राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ पाणी येत असल्याने आम्ही न्याय मागण्यासाठी नगरपंचायतीत गेलो, तर तेथे कुणीच उत्तर देण्यासाठी आले नाही.

नगरपंचायतीच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत ! – चेतन चव्हाण, नगराध्यक्ष

कसई-दोडामार्ग या नगरपंचायत क्षेत्रात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी देणे हे आमचे दायित्व आहे. काही दिवसांतच नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे कुणीही राजकारण करू नये.