कॅलिफोर्नियाच्या (अमेरिका) गव्हर्नरने नकाराधिकार वापरून हिंदुविरोधी विधेयक रोखले !

अमेरिकेतील हिंदूंच्या आंदोलनाचा परिणाम !

कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम

कॅलिफोर्निया (अमेरिका) – कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी त्यांचा नकाराधिकार (व्हेटो) वापरून जातीभेद विरोधाचे नाव देऊन प्रत्यक्षात हिंदुविरोधी विधेयक रोखले. गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी विधेयक रोखल्याने ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ने समाधान व्यक्त केले आहे.

१. कॅलिफोर्निया राज्यात आधीच लिंग, वंश, रंग, धर्म, राष्ट्रीय मूळ, विकलांगता, लैंगिक ओळख आदी भेदभाव रोखणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्यासाठी कोणत्याही नव्या कायद्याची गरज नाही. यासाठी मी या विधेयकावर स्वाक्षरी करणार नाही, तर नकाराधिकार वापरतो, असे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी स्पष्ट केले.

‘अमेरिकन हिंदु फाऊंडेशन’चे आंदोलन

२. ‘एस्बी-४०३’ नावाचे हे विधेयक कॅलिफोर्नियाच्या विधीमंडळाने मार्च २०२३ मध्येच संमत केले होते. यात ‘हिंदु धर्मातील विशिष्ट प्रथा आणि परंपरा या भेदभाव करणार्‍या आहेत’, असा दावा करून संपूर्ण हिंदु धर्मालाच अपकीर्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ‘हिंदूंच्या धार्मिक प्रथा भेदभाव करणार्‍या आहेत’ असे अत्यंत चलाखीने यात सूचित करण्यात आले होते.

३. या विधेयकाची सर्व भाषा भेदभावाची आणि हिंदु धर्म आणि दक्षिण आशियाई हिंदु समाज यांच्याविषयी प्रचंड अपसमज निर्माण करणारी होती. त्यामुळे ‘अमेरिकन हिंदु फाऊंडेशन’ने या विधेयकाच्या विरोधात कॅलिफोर्नियात मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाची नोंद घेऊन गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी हे विधेयक रोखले.