‘दैनिक लोकसत्ता’कडून सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांची अपकीर्ती !

  • गोरक्षक वैभव राऊत यांना जामीन मिळाल्याच्या वृत्तामध्ये प्रसिद्ध केले चेतन राजहंस यांचे छायाचित्र !

  • १ दिवसानंतर छायाचित्र पालटून खोडसाळपणा झाकण्याचा प्रयत्न !

गोरक्षक वैभव राऊत यांना जामीन मिळाल्याच्या वृत्तामध्ये दैनिक लोकसत्ता’कडून प्रसिद्ध केले चेतन राजहंस यांचे छायाचित्र

मुंबई – ‘दैनिक लोकसत्ता’ ने ७ ऑक्टोबर या दिवशी ‘www.loksatta.com’ या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘सनातन संस्थेच्या कथित सदस्याच्या घर-गोडाऊनमधून २० बाँब जप्त, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर’ हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या खटल्यातील श्री. वैभव राऊत यांना जामीन मिळाल्याविषयीच्या या वृत्तामध्ये त्यांच्या छायाचित्राच्या ऐवजी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. वृत्तामध्ये कोणताही संदर्भ नसतांना श्री. चेतन राजहंस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून या वृत्तामध्ये श्री. चेतन राजहंस हे आरोपी असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या वृत्तामुळे श्री. चेतन राजहंस यांची समाजात अपकीर्ती झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या वृत्तामध्ये कुठेही श्री. चेतन राजहंस यांची प्रतिक्रिया किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यांचे छायाचित्र या वृत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे वृत्त वाचणार्‍याला हे छायाचित्र श्री. वैभव राऊत यांचे असल्याचे भासते. त्यामुळे या वृत्तामधून श्री. चेतन राजहंस यांची जामिनावर सुटका झाल्याचे वाटत आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले श्री. वैभव राऊत हे ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे कार्यकर्ते आहेत. असे असतांना लोकसत्तामधील वृत्तात श्री. वैभव राऊत यांचा उल्लेख ‘सनातन संस्थेचे कथित सदस्य’ असा करण्यात आला आहे. यातून सनातन संस्थेचीही अपकीर्ती करण्यात आली आहे. १ दिवसानंतर श्री. राजहंस यांचे छायाचित्र संकेतस्थळावरून काढल्याचे निदर्शनास आले.