सनातन संस्थेची हेतूतः अपकीर्ती करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार! – सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

मुंबई – नुकताच नालासोपारा प्रकरणामध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे श्री. वैभव राऊत यांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणी श्री. वैभव राऊत यांच्यावर त्यांच्याकडे बॉम्ब सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. दैनिक लोकसत्ताने श्री. वैभव राऊत यांना जामीन मिळाल्याच्या बातमीमध्ये त्यांचा ‘सनातनचे कथित सदस्य’ असा उल्लेख केला आहे; मात्र वैभव राऊत यांच्या छायाचित्राच्या जागी हेतूतः सनातन संस्थेचे अधिकृत राष्ट्र्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे छायाचित्र वापरले आहे. यातून पुन्हा एकदा या प्रकरणाशी सनातन संस्थेचा संबंध जोडण्याचा खोडसाळ प्रयत्न दै. लोकसत्ताने केला आहे. श्री. चेतन राजहंस समाजात प्रतिदिन विविध कार्यक्रमांमध्ये जातात, तसेच अनेक वृत्तवाहिन्यांवर सनातनची भूमिका मांडतात. वृत्तपत्र आणि माध्यमे यांना ते सुपरिचित आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी दैनिक लोकसत्ताच्या कार्यालयातही अनेकदा भेटी दिल्या आहेत. तरीदेखील त्यांचे छायाचित्र या बातमीत छापून सनातनचा संबंध दर्शवण्याचा आणि चेतन राजहंस यांचीही अपकीर्ती करण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे.

नालासोपारा प्रकरणाशी सनातन संस्थेशी काही संबंध नाही, हे अनेकदा स्पष्ट करूनही संपूर्ण बातमीमध्ये श्री. वैभव राऊत यांना ‘सनातन संस्थेचा कथित सदस्य’ असे संबोधले आहे. यासह ‘राऊत आणि इतर आरोपी हे सनातन संस्थेचे सक्रीय सदस्य होते’, असेही या बातमीत म्हटले आहे. दैनिक लोकसत्ताने सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांची हेतूतः अपकीर्ती केली आहे. या प्रकरणी सनातन संस्थेने दैनिक लोकसत्ताच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू केली आहे, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी सांगितले आहे.