कॅनडाला धडा शिकवा, त्‍याचा भारत बनवून त्‍याच्‍यावर राज्‍य करा !

जगमीत सिंग

१. कॅनडात स्‍थायिक होण्‍यामध्‍ये भारतियांचे प्रमाण लक्षणीय ! 

‘गेल्‍या काही दिवसांपासून कॅनडा चर्चेत आहे. तेथील खलिस्‍तानी समर्थक भारताला विविध प्रकारे त्रास देत असतात. मध्‍यंतरी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांच्‍या वक्‍तव्‍याला माध्‍यमांनी पुष्‍कळ प्रसिद्धी दिली होती. तेथे अद्यापही खलिस्‍तानी भारतविरोधी कृत्‍य करत आहेत. कॅनडा हा ३ कोटी लोकसंख्‍या असलेला देश आहे. अर्धा कॅनडा हा उजाड आहे, म्‍हणजे तेथे केवळ बर्फ पडतो. कॅनडाच्‍या त्‍या वरच्‍या भागात काही लाख लोक रहातात. त्‍यांना जिवंत कसे ठेवायचे, हा कॅनडाचा नेहमीच पडलेला प्रश्‍न असतो. आज कॅनडाच्‍या लोकसंख्‍येचा दर शून्‍य आहे; कारण तेथे मृत्‍यूदर अधिक असून जन्‍मदर अल्‍प आहे. तेथे लोकसंख्‍या अल्‍प असल्‍याने विविध कामांसाठी लोक लागतात. प्रतिवर्षी तेथे पुढील वर्षी किती शिक्षक, प्राध्‍यापक, वाहतूक करणारे, अभियंते, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ (आयटी प्रोफेशनल्‍स) आदींची आवश्‍यकता लागेल, हे सांगितले जाते. त्‍या आधारे हा देश प्रतिवर्षी ८-१० लाख नवीन लोकांना नागरिकत्‍व देतो. त्‍यात भारतियांचा वाटा लक्षणीय आहे. मागील वर्षी एक ते दीड लाख भारतीय तेथे स्‍थायिक झाले आहेत. तेच मग देश चालवण्‍याचा प्रयत्न करतात.

 ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

आज कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो हे अल्‍प मतात आहेत. त्‍यांचे सरकार जगमीत सिंग यांच्‍या नॅशनल डेमोक्रॅटिक पक्षाच्‍या पाठिंब्‍यावर टिकून आहे. त्‍यामुळे केवळ मतपेटीच्‍या राजकारणासाठी ट्रुडो खलिस्‍तानी आतंकवाद्यांना साहाय्‍य करतात. खरे तर त्‍यांना खलिस्‍तानी न म्‍हणता ‘कॅनडातील आतंकवादी’ म्‍हणायला हवे. त्‍यातील काही लोकांचा जन्‍म हा कॅनडामध्‍येच झाला आहे. उदा. जगमीत सिंग हे तेथील एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्‍यांचा जन्‍म तेथेच झाला आहे. त्‍यामुळे त्‍यांना भारतीय म्‍हणता येत नाही. त्‍यामुळे याला ‘खलिस्‍तानी’ हा शब्‍द न वापरता ‘कॅनडातून भारतात आतंकवाद पसरवला जात आहे’, असे म्‍हणणे अधिक चांगले राहील.

२. कॅनडाला धडा कसा शिकवावा ?

अनेकदा सांगूनही कॅनडा समजण्‍यास सिद्ध नाही. त्‍याला मतपेटीचे राजकारण कारणीभूत आहे. प्रत्‍येक वर्षी दोन-अडीच लाख विद्यार्थी भारतातून कॅनडात शिक्षणासाठी जातात. सध्‍या कॅनडा आणि भारत यांच्‍यातील संबंध बिघडलेले आहेत. त्‍यामुळे यावर्षी तेथे शिक्षणासाठी विद्यार्थी जाण्‍याची शक्‍यता नाही. त्‍यामुळे ते ऑस्‍ट्रेलिया, न्‍यूझीलंड किंवा युरोपमधील देशांमध्‍ये शिक्षणासाठी जाऊ शकतात. कॅनडामध्‍ये कोणताही उद्योग नाही. तो शिक्षण, पर्यटन आणि सेवा (सर्व्‍हिस) क्षेत्र यांवर जिवंत आहे. भारताने तेथे विद्यार्थीच पाठवले नाही, तर तो जिवंत राहू शकत नाही.

दुसरे भारतियांनी कॅनडामध्‍ये पर्यटक म्‍हणूनही जाऊ नये. त्‍याऐवजी त्‍यांनी अन्‍य देशांना प्राधान्‍य दिले पाहिजे. सध्‍या भारताने कॅनडातून भारतात येणार्‍या लोकांना ‘व्‍हिसा’ देण्‍याचे थांबवले आहे. मागील वर्षी अनुमाने ३ लाखांहून अधिक कॅनडियन भारतात आले होते. अर्थातच त्‍यात अधिकांश पंजाबी किंवा शीख होते. कॅनडामध्‍ये अनेक पंजाबी लोक स्‍थायिक झाले आहेत; पण त्‍यांचे नातेवाइक किंवा आईवडील भारतात आहेत. याखेरीज सर्वांत महत्त्वाचे म्‍हणजे शिखांची गुरुद्वारेही भारतात आहेत. तसेच अनेकांच्‍या मालमत्ता भारतात आहेत. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर कॅनडातील हे लोक भारतात येत असतात.

आज कॅनडात रहाणे अतिशय खर्चाचे झाले आहे, हे भारतियांना कळायला पाहिजे. तेथे विद्यार्थी म्‍हणून जाणेही खर्चिक झाले आहे. तेथे २-३ वर्षे रहाण्‍याचा अनुमाने ६० ते ७० लाख रुपये व्‍यय येऊ शकतो. त्‍यामुळे तेथे न जाता युरोपातील आयर्लंड, फ्रान्‍स या देशांमध्‍ये जाऊ शकतो; कारण तुलनात्‍मकरित्‍या तेथे स्‍वस्‍त आहे. वास्‍तविक भारताच्‍या बाहेर जाऊन शिकण्‍याची आवश्‍यकताच नाही; पण ज्‍याला जायचे आहे, त्‍याला थांबवू शकत नाही. अशा प्रकारे काही उपाय केले, तर भारत कॅनडाला धडा शिकवू शकतो. आज भारताला कॅनडाची आवश्‍यकता असण्‍यापेक्षा त्‍याला भारताची अधिक आवश्‍यकता आहे. कॅनडाने तूरडाळ पाठवली नाही, तरी त्‍याचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. ती आफ्रिकेतून वगैरे देशांतून मागवू शकतो.

३. राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडून खलिस्‍तानी समर्थकांवरील कारवाईला प्रारंभ 

आता भारताच्‍या राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) खलिस्‍तान्‍यांना धडा शिकवायला प्रारंभ केला आहे. त्‍यांनी १९ खलिस्‍तान्‍यांची मालमत्ता कह्यात घेतली आहे. त्‍यात विविध चित्रफिती प्रसारित करून भारताला धमक्‍या देणार्‍या गुरुवंतसिंह पन्‍नू याचाही समावेश आहे. त्‍यामुळे त्‍याला मोठा धक्‍का बसला आहे. त्‍याचप्रमाणे अन्‍य समर्थकांचीही मालमत्ता कह्यात घेण्‍यात येत आहे. कॅनडा, इंग्‍लंड, युरोप किंवा ऑस्‍ट्रेलिया या ठिकाणी जेव्‍हा जेव्‍हा भारताच्‍या विरोधात निदर्शने केली जातात, तेव्‍हा तेव्‍हा त्‍यांचे ध्‍वनीमुद्रण सहजपणे केले जाऊ शकते. अशा लोकांना ‘भारतविरोधी’ घोषित केले जावे आणि त्‍यांना भारतात येण्‍यापासून थांबवावे. तो त्‍यांच्‍यासाठी एक मोठा धडा असेल. जे आतंकवादी कारवाया करतात, त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करावी. पन्‍नू याच्‍या विरोधात प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवलेला आहे आणि त्‍याला ‘गुन्‍हेगार’ म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे.

४. आता भारतियांनी जगावर राज्‍य करण्‍याची वेळ !

आता भारताने जगावर राज्‍य करण्‍यास शिकले पाहिजे. ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान, अमेरिकेच्‍या उपराष्‍ट्रपती कमला हॅरिस, तसेच पोर्तुगालचे अध्‍यक्ष हे भारतीय मूळ निवासी आहेत. याच समवेत एक भारतीय मॉरिशसवर राज्‍य करत आहे. आफ्रिकेतील काही देशांमध्‍येही भारतीय राज्‍य करत आहेत. अनेक भारतीय विदेशात जाऊन तेथे स्‍थायिक झाले आहेत. तेथे त्‍यांनी अत्‍यंत कष्‍ट घेतले आणि आज ते तेथे राज्‍य करत आहेत किंवा महत्त्वाचे व्‍यक्‍ती बनले आहेत. अमेरिकेत आता निवडणूक होणार आहे. तेथे रिपब्‍लिक पक्षातील ५ उमेदवारांपैकी २ भारतीय आहेत. एक विवेक रामास्‍वामी हे पुष्‍कळ पुढे गेले होते. दुसरी निक्‍की हॅले तिचे मूळ नाव बाजवा आहे. या दोघांपैकी एक जिंकण्‍याची निश्‍चित शक्‍यता आहे. त्‍यामुळे भारतियांनी खलिस्‍तान्‍यांना अधिक घाबरण्‍याचे कारण नाही. त्‍याऐवजी इतर देशांवर कसे राज्‍य करता येईल, याकडे अधिक लक्ष देणे आवश्‍यक आहे. भारतीय हे हुशार आणि कर्तृत्‍वत्‍वान असतात, तसेच ते कष्‍ट करत असतात. त्‍यामुळे त्‍यांचे कर्तृत्‍व त्‍या देशांना कळते. त्‍यामुळे ते भारतियांना निवडतात. मला वाटते, ‘आता भारतियांनाच जगावर राज्‍य करण्‍याची वेळ आलेली आहे.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.

संपादकीय भूमिका

आज भारताला अन्‍य देशांची आवश्‍यकता असण्‍यापेक्षा त्‍यांना भारताची आवश्‍यकता वाटणे यातूनच भारताची महानता लक्षात येते !