काश्‍मीरमध्‍ये नवीन जलविद्युत प्रकल्‍प चालू केल्‍याने पाकिस्‍तानचा जळफळाट !

इस्‍लामाबाद – भारताने जम्‍मू-काश्‍मीरमधील चिनाब नदीवर किरू आणि क्वार नावाचे दोन नवीन जलविद्युत प्रकल्‍प चालू केले आहेत. भारताच्‍या या जलविद्युत प्रकल्‍पांवर पाकिस्‍तान संतापला आहे. १९६० मध्‍ये झालेल्‍या सिंधू जल कराराचे उल्लंघन असल्‍याचा दावा करत पाकिस्‍तानने भारताच्‍या या आराखड्यांवर आक्षेप घेतला आहे. झेलम नदीवरील किशनगंगा प्रकल्‍प आणि चिनाब नदीवरील रतले जलविद्युत प्रकल्‍प यांच्‍या आराखड्यांवरून भारत आणि पाकिस्‍तान आधीच हेगमधील लवाद न्‍यायालयात सध्‍या कायदेशीर लढाई लढत आहेत. या ताज्‍या वादामुळे दोन्‍ही देशांमधील वाद पुन्‍हा एकदा उफाळून आला आहे.

किरू जलविद्युत प्रकल्‍पाची क्षमता ६२४ मेगावॅट आणि क्वार जलविद्युत प्रकल्‍पाची क्षमता ५४० मेगावॅट आहे. सिंधू जल कराराच्‍या नियमांनुसार, भारताला जलविद्युत प्रकल्‍पांच्‍या आराखड्यांविषयी पाकिस्‍तानसोबत चर्चा करणे बंधनकारक आहे. या संपूर्ण प्रकरणात पाकिस्‍तानच्‍या एका वरिष्‍ठ अधिकार्‍याने सांगितले की, भारताने या दोन जलविद्युत प्रकल्‍पाविषयीचे आराखडे पाकिस्‍तानकडे पाठवले होते. या दोन्‍ही प्रकल्‍पांच्‍या आराखड्यांवर आपण आक्षेप नोंदवला आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.