कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगालमध्ये विहिंप आणि बजरंग दल यांच्या शौर्य जागरण यात्रेला अनुमती

  • बंगाल पोलिसांनी नाकारली होती अनुमती !

  • यात्रेला उत्साहात प्रारंभ !

कोलकाता (बंगाल) – कोलकाता उच्च न्यायालयाने (Kolkata High Court) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विश्‍व हिंदु परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि बजरंग दल (Bajrang Dal) यांच्या ला अनुमती दिली. पोलिसांकडून यात्रेसाठी अनुमती नाकारण्यात आल्याने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. न्यायालयाच्या अनुमतीनंतर लगेचच या यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा चालू रहाणार आहे.

न्यायालयात युक्तीवाद करतांना या संघटनांकडून सांगण्यात आले की, या यात्रेचा उद्देश हिंदु धर्माच्या संदर्भात विविध सूत्रांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा आहे. तसेच हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांच्या रक्षणासाठी आजन्म कार्य करणार्‍यांचा सन्मान करण्याचाही या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. ही यात्रा ऐतिहासिक महत्त्व असणार्‍या भागांतून जाणार आहे. या यात्रेत कोणतीही शस्त्रे असणार नाहीत. आम्ही लोकांमध्ये राष्ट्रनिष्ठेची ज्योत पेटवण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले आहे. यात ३ ट्रक आणि २० मोटारसायकल, तसेच २०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

संपादकीय भूमिका 

  • बंगालमधील हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसच्या राज्यात हिंदु संघटनांना कसे दडपले जाते, हेच यातून लक्षात येते !
  • ‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !