पुणे – दावोस दौर्यात ४० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप खोटा असून या दौर्यात ३२ कोटी रुपये खर्च आला, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या दौर्यामध्ये १ लाख ३७ सहस्र कोटींचे १९ सामंजस्य करार झाले असून त्यामुळे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. यामध्ये ७७ टक्के उद्योजकांना देय करारपत्रही दिले आहे. महायुती सरकारच्या काळात तिमाहीमध्ये आपले राज्य गुंतवणुकीमध्ये अग्रणी राहील, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा कुणाच्या ट्वीटमुळे नाही, तर नागपूर येथील पाऊस आणि राज्यातील आंदोलन यांमुळे रहित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भात योग्य निर्णय घेतील; कारण तिन्ही नेत्यांना राज्याची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती माहिती आहे, असे त्यांनी सांगितले. पुणे दौर्यावर आल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्योगमंत्री सामंत बोलत होते.