श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यातील समष्‍टीच्‍या उद्धाराच्‍या तीव्र तळमळीमुळे ७ वर्षांपासून निरंतर चालू असलेली भक्‍तीसत्‍संगरूपी दिव्‍य शृंखला !

आज ५ ऑक्‍टोबर २०२३ या दिवशी भक्‍तीसत्‍संगाला ७ वर्षे पूर्ण होत आहेत, त्‍या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आश्विन शुक्‍ल पक्ष चतुर्थी (५.१०.२०१६) या दिवशी नवरात्रीमध्‍ये पहिला भावसत्‍संग झाला. त्‍यानंतर सत्‍संगाचा आध्‍यात्मिक स्‍तर (दर्जा) वाढत जाऊन अवघ्‍या ५ वर्षांतच म्‍हणजे ३०.९.२०२१ या दिवशी भावसत्‍संगाचे रूपांतर भक्‍तीसत्‍संगामध्‍ये झाले. या सत्‍संगांचा भावसत्‍संग ते भक्‍तीसत्‍संग असा दिव्‍य प्रवास होऊन त्‍याद्वारे साधकांमध्‍येही शीघ्रतेने भक्‍तीवृद्धी होत आहे. त्‍यामागे श्रीगुरूंची (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कृपा आणि संकल्‍पशक्‍ती यांचे बळ आहे. श्रीगुरूंच्‍या मनात जसा जगताच्‍या कल्‍याणाचा तीव्र ध्‍यास आहे, तसाच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यामध्‍येही तीव्र ध्‍यास आहे. त्‍यामुळेच त्‍यांनी या सत्‍संगांना आरंभ केला. सत्‍संगाला ७ वर्षे पूर्ण होण्‍याच्‍या निमित्ताने या भक्‍तीसत्‍संगाची जननी असलेल्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याप्रतीही कृतज्ञता व्‍यक्‍त करणे क्रमप्राप्‍त आहे.

मागील ७ वर्षांपासून निरंतर चालू असलेल्‍या या सत्‍संगांचा साधकांना होत असलेला आध्‍यात्मिक आणि भावभक्‍ती या स्‍तरांवरील लाभ सर्वांनी अनुभवलाच आहे. ‘या सत्‍संगांचा स्‍तर वाढत जाण्‍यामागे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची तळमळ, त्‍यांच्‍या सहवासातून त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली दिव्‍य सूत्रे आणि सत्‍संगाच्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची उच्‍च कोटीची आध्‍यात्मिक अवस्‍था’, यांविषयी आम्‍ही आमच्‍या अल्‍पबुद्धीने जे काही अनुभवले, ते सर्व समष्‍टीपुढे या लेखातून व्‍यक्‍त करत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. ‘साधकांना सत्‍संग मिळावा’,अशी तीव्र तळमळ असणे

१ अ. कोणत्‍याही कारणांनी सत्‍संगाला विलंब होऊ न देता वेळेवर चालू करणे : काही वेळा सेवा अथवा अन्‍य कारणांमुळे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ बाहेर गेल्‍या असतील, तर त्‍याचा परिणाम सत्‍संगावर होऊ नये, यासाठी त्‍या प्रयत्न करतात. ‘त्‍यांच्‍यामुळे सत्‍संगाला विलंब झाला’, असे आतापर्यंत कधीच झाले नाही. त्‍या कधी बाहेर गेल्‍या असल्‍या, तरी सत्‍संगाच्‍या ५ किंवा १० मिनिटे आधी पोचून सत्‍संगाला आरंभ करतात. त्‍या वेळी ‘मी थकले आहे. आता मला शक्‍य नाही. सत्‍संग थोडा विलंबाने चालू करावा’, असा विचार त्‍या करत नाहीत. आहे त्‍या स्‍थितीमध्‍ये, स्‍वतःचा जराही विचार न करता, त्‍या सत्‍संग आरंभ करतात. ‘त्‍यांच्‍यातील तीव्र तळमळीमुळेच त्‍या अखंडपणे हे सत्‍संग घेत आहेत’, असे लक्षात येते.

१ आ. ‘सर्वत्रच्‍या साधकांना साधनेसाठी आणि भक्‍तीवृद्धीसाठी दिशा मिळावी, यासाठी अनिष्‍ट शक्‍तींच्‍या सूक्ष्मातील आक्रमणांशी लढून भक्‍तीसत्‍संग घेणे : भक्‍तीसत्‍संगाच्‍या दिवशी सकाळपासूनच त्‍यांच्‍यावर सूक्ष्मातील अनिष्‍ट शक्‍तींची पुष्‍कळ आक्रमणेे होत असतात, तरीही ‘सर्वत्रच्‍या साधकांना साधना आणि भक्‍तीवृद्धी यांसाठी दिशा मिळावी, सर्व साधकांची गुरूंना अपेक्षित अशी लवकरात लवकर आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी,’ या उत्‍कट ध्‍यासामुळे त्‍या सर्व प्रकारच्‍या आक्रमणांशी लढून समष्‍टीच्‍या उद्धाराची तळमळ आणि गुरुभक्‍ती यांच्‍या बळावर भक्‍तीसत्‍संग घेत असतात.

कु. वैष्‍णवी वेसणेकर

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या सहवासात असतांना त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली दिव्‍य सूत्रे

२ अ. सत्‍संगाशी एकरूप असणे

२ अ १. अष्‍टावधानी : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍याकडे सतत विविध प्रकारच्‍या सेवा असतात. काही वेळा तातडीच्‍या सेवा असतील, तर सत्‍संग घेतांना मध्‍ये थोडा वेळ मिळाल्‍यास त्‍या वेळेतही त्‍यांच्‍या सेवा चालूच असतात. या सेवा करतांनाही त्‍यांचे सत्‍संगाकडे तेवढेच लक्ष असते. ‘सत्‍संगात कोणता साधक काय बोलत आहे’, हेही त्‍या तेवढ्याच एकाग्रतेने ऐकतात. पुष्‍कळ वेळा ‘सत्‍संगात साधक काय सांगतात ?’, ते आम्‍हाला समजत नाही; पण श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ अन्‍य सेवा करत असल्‍या, तरीही आम्‍हाला सांगतात, ‘‘यांनी किती छान प्रयत्न केले आहेत ! ऐकतांना चांगले वाटते !’ त्‍या एकाच वेळी अनेक सेवांचे शिवधनुष्‍य पेलत आहेत. त्‍यामुळेच त्‍यांच्‍या सेवेची फलनिष्‍पत्ती अफाट असल्‍याचे लक्षात येते.

२ अ २. सत्‍संग चालू असतांना साधकांचे निरोप ऐकून त्‍यांना उत्तरे देणे आणि पुन्‍हा सत्‍संगाशी एकरूप होणे : अनेकदा काही महत्त्वाचे अथवा तातडीचे निरोप असल्‍यास त्‍यांना ते सत्‍संग चालू असतांनाही घ्‍यावे लागतात. साधक त्‍यांना निरोप देण्‍यासाठी येतात. तेव्‍हा ते ऐकून घेऊन त्‍यावरील उत्तरही त्‍या देतात आणि त्‍या पुन्‍हा सत्‍संगाशी एकरूप होतात. हे त्‍यांचे एक आगळेच वैशिष्‍ट्य आहे. एका स्‍थितीतून लगेच अन्‍य स्‍थितीत जाणे त्‍यांना जमते; कारण त्‍या सतत वर्तमानात असतात.

२ अ ३. दुपारी मराठी भाषेतील सत्‍संग असतो आणि तोच विषय पुन्‍हा रात्री हिंदी भाषेतून घ्‍यायचा असतो. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ दुपारी घेत असलेला विषय पुन्‍हा रात्री हिंदी भाषेत घेतात, तेव्‍हा प्रत्‍येक वेळी त्‍यांना ‘त्‍या हा विषय नव्‍यानेच ऐकत आहेत’, असे जाणवते.

कु. योगिता पालन

२ अ ४. सत्‍संगातील विषयाशी एकरूपता आणि त्‍यांच्‍या वाणीतील चैतन्‍य यांमुळे साधकांना विषयाचे आकलन होणे : एखादा विषय ऐकतांना श्रोत्‍यांच्‍या मनात उत्‍सुकता असते, त्‍याप्रमाणेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या मनातही उत्‍सुकता असते. खरे तर त्‍यांना तो विषय ठाऊक असतो, तरीही त्‍या सतत वर्तमानकाळात आणि शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असल्‍याने तेवढ्याच उत्‍सुकतेने अन् जिज्ञासेने तो विषय जाणून घेऊन सत्‍संगात मांडतात. त्‍यामुळे पुष्‍कळ वेळा विषय कठीण असला, तरी ‘त्‍यांनी संपूर्ण एकरूपतेने विषय मांडणे, तसेच त्‍यांच्‍या वाणीतील चैतन्‍य यांमुळे त्‍या विषयाचे साधकांना आकलन होते’, असे आमच्‍या लक्षात येते.

२ अ ५. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ सत्‍संग घेतांना स्‍थूलदेहाने रामनाथी आश्रमात असून त्‍यांचे सूक्ष्मरूप सत्‍संग ऐकणार्‍या सर्वत्रच्‍या साधकांना भक्‍तीवृद्धीसाठी आशीर्वाद प्रदान करत असल्‍याचे जाणवणे : त्‍यांचे चित्त, त्‍यांचे रोमरोम त्‍या सत्‍संगाशी पूर्ण एकरूप झालेले असते. सत्‍संग घेतांना त्‍या केवळ देहाने रामनाथी आश्रमात बसलेल्‍या असतात; मात्र त्‍यांचे सूक्ष्मरूप जणू सत्‍संग ऐकणार्‍या सर्वत्रच्‍या साधकांपर्यंत पोचून प्रत्‍येकाला भक्‍तीवृद्धीसाठी आशीर्वाद प्रदान करत असल्‍याचे जाणवते.

२ आ. भक्‍तीसत्‍संगातील अडथळे दूर होण्‍यासाठी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करणे

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ भक्‍तीसत्‍संग घेत असतांना पुष्‍कळ सतर्क असतात. भक्‍तीसत्‍संगातील अडथळे दूर होण्‍याच्‍या संदर्भात संतांनी जे उपाय सांगितले आहेत, ते त्‍या भावपूर्णपणे करतात. त्‍याचप्रमाणे ‘सत्‍संगात बोलतांना वातावरणातील दाब अथवा त्‍यांच्‍यावरील अनिष्‍ट शक्‍तींची आक्रमणे वाढत आहेत’, असे त्‍यांना लक्षात येते. तेव्‍हा त्‍या लगेच सतर्कतेने वेगवेगळ्‍या प्रकारचे उपाय, उदा. विभूती लावणे, मुद्रा करणे, सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना नामजपादी उपाय करण्‍यास कळवणे इत्‍यादी करू लागतात.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍यावर अनिष्‍ट शक्‍तींची आक्रमणेे होत असल्‍याने सत्‍संगाच्‍या आधी सद़्‍गुुरु गाडगीळकाका त्‍यांच्‍यासाठी नामजपादी उपाय करतात. अनेकदा आक्रमणांचे प्रमाण अधिक असल्‍यास संपूर्ण सत्‍संगातही सद़्‍गुरु गाडगीळकाकांना नामजपादी उपाय करावे लागतात. सत्‍संग संपल्‍यावर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ सांगतात, ‘सद़्‍गुरु काका उपाय करतात; म्‍हणून त्रास अल्‍प झाला आणि सत्‍संगातील अडथळे दूर झाले.’  काही वेळा त्‍या सद़्‍गुरु काकांना तसा निरोपही द्यायला सांगतात.

२ इ. सत्‍संगाचे पूर्ण श्रेय सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाच देणे : त्‍यांच्‍यात जराही कर्तेपणा नाही. त्‍या सत्‍संगाचे संपूर्ण श्रेय सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाच देतात. कुणी सत्‍संगाविषयीचे चांगले अनुभव सांगितल्‍यावर त्‍याविषयी त्‍या लगेच म्‍हणतात, ‘‘परात्‍पर गुरुदेव आपल्‍यासाठी किती करतात ना ! त्‍यांच्‍यामुळेच आपल्‍याला हे सर्व अनुभवायला मिळते, नाहीतर आपल्‍याला अशा अनुभूती कशा घेता आल्‍या असत्‍या !’’ अशा प्रकारे कुणीही काहीही सांगितले, तरी त्‍या त्‍याचे श्रेय परात्‍पर गुरुदेवांना अर्पण करून त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करतात. त्‍या वेळी सद़्‍गुरु ताईंच्‍या मनात असलेल्‍या गुरुदेवांप्रतीच्‍या अपार कृतज्ञतेचे तरंग समोरच्‍या साधकापर्यंत पोचून त्‍याच्‍याही मनातील परात्‍पर गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत होतो.

३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची अनुभवलेली उच्‍च कोटीची आध्‍यात्मिक अवस्‍था

३ अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या एका शब्‍दाने वातावरणात आनंद आणि भक्‍ती निर्माण होणे : सर्वत्रचे साधक भक्‍तीसत्‍संगाची, म्‍हणजेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या आवाजाची वाट पहात असतात. सत्‍संगाच्‍या आरंभी त्‍या ‘सर्वांना नमस्‍कार’ एवढेच शब्‍द उच्‍चारतात. तेव्‍हा क्षणातच वातावरण पालटते. ‘त्‍यांचे ते शब्‍द प्रत्‍येकाच्‍या अंतरंगात जाऊन वातावरणात आनंद आणि भक्‍ती निर्माण करतात’, असे जाणवते. त्‍या प्रत्‍येकाच्‍या अंतरातील भक्‍तीची तार छेडून त्‍याच्‍यात भावाची निर्मिती करतात, जागृती करतात आणि त्‍यात वृद्धी करतात.

३ आ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या मुखावर विविध प्रकारच्‍या भावावस्‍था अनुभवायला मिळणे : ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ सत्‍संग घेत असतांना त्‍यांच्‍याकडे पहातच रहावे’, असे वाटते. त्‍यांच्‍या मुखावर प्रसंगानुसार विविध प्रकारच्‍या भावावस्‍था अनुभवायला मिळतात. सत्‍संगानंतर त्‍या प्रत्‍येक वेळी ‘त्‍यांनी सत्‍संगात कशा प्रकारे भावावस्‍था अनुभवली ?’, ते सांगतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍यातील उच्‍च कोटीचा भाव आम्‍हालाही शिकायला मिळतो.

३ इ. सत्‍संगात बोलतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मन विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्‍याशी एकरूप झाल्‍याचे जाणवणे : त्‍या सांगतात, ‘सत्‍संगामध्‍ये एखादा विषय अथवा कथा सांगत असतांना मी तो शब्‍दांमध्‍ये मांडत असले, तरीही सांगत असतांना भगवंत मला शब्‍दांच्‍या पलीकडले भावविश्‍व अनुभवायला देतो.’ सत्‍संगात बोलतांना स्‍वतःची बुद्धी कार्यरत न होता त्‍यांचे मन विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्‍याशी एकरूप झाल्‍याचे जाणवते. त्‍यामुळे सत्‍संगात बोलतांना त्‍यांचे शब्‍दांकडे लक्ष नसते. त्‍या केवळ त्‍या कथेशी, कथेतील प्रसंगांशी आणि त्‍या वातावरणाशी एकरूप असतात. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍यामधील या उच्‍च कोटीच्‍या भावामुळेच सत्‍संगाला उपस्‍थित असलेल्‍या साधकांनाही सत्‍संगासंदर्भात दिव्‍य अनुभूती येतात.

३ ई. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची चैतन्‍यमय वाणी आणि उत्‍कट भक्‍ती यांमुळे अनिष्‍ट शक्‍तींचा समष्‍टीवर काहीच परिणाम न होता समष्‍टीने त्‍या सत्‍संगातील आनंद लुटणे आणि भाव अनुभवणे : ७.९.२०२३ या दिवशी गोपाळकाल्‍यानिमित्त झालेल्‍या विशेष भक्‍तीसत्‍संगाचा विषय आणि त्‍यातील कथा पुष्‍कळ सुंदर होत्‍या, तरीही मला (कु. योगिता पालन हिला) आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना सत्‍संगाच्‍या वेळी नेहमीप्रमाणे भावजागृती होत नसल्‍याचे जाणवले. त्‍यामुळे ‘सत्‍संगाचा विषय घेतांना अजून कुठे न्‍यून पडलो ?’ असे आम्‍हाला वाटत होते; परंतु त्‍या दिवशी अनेक साधकांनी सत्‍संगाविषयी आलेले पुष्‍कळ चांगले अनुभव सांगितले. काही साधकांनी प्रत्‍यक्ष श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍याकडे जाऊन सत्‍संगाविषयी त्‍यांना आलेल्‍या अनुभूती आणि चांगले अनुभव सांगितले. तेव्‍हा लक्षात आले, ‘अनिष्‍ट शक्‍तींनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ सत्‍संग घेत असलेल्‍या ठिकाणी दाब निर्माण केल्‍यामुळे आम्‍हाला असे जाणवले असले, तरी प्रत्‍यक्षात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची चैतन्‍यमय वाणी आणि उत्‍कट भक्‍ती यांमुळे अनिष्‍ट शक्‍तींचा समष्‍टीवर काहीच परिणाम झाला नाही. समष्‍टीने नेहमीप्रमाणे त्‍या सत्‍संगातील आनंद लुटला आणि भाव अनुभवला. यातून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍यातील आध्‍यात्मिक सामर्थ्‍याची प्रचीती आली.

मागील ७ वर्षांपासून ही भक्‍तीसत्‍संगरूपी दिव्‍य शृंखला निरंतर चालू आहे, ती श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍यातील गुरुभक्‍ती आणि त्‍यांच्‍यातील समष्‍टीच्‍या उद्धाराची तळमळ यांमुळेच आहे.

४. कृतज्ञता

अ. आम्‍हा सर्वांचे भाग्‍य उजळले; म्‍हणून आम्‍हाला साक्षात् आदिशक्तिस्‍वरूप श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांचे हे दिव्‍य भक्‍तीसत्‍संग लाभत आहेत. ‘हे माते, आम्‍ही लेकरे तुझ्‍या चरणकमली शरणागत झालो आहोत. प्रतीसप्‍ताह या भक्‍तीसत्‍संगाच्‍या २ घंट्यांमध्‍ये तुझी साधकांवरील अपार प्रीती आणि त्‍यांच्‍या उद्धाराची तळमळ आम्‍ही अनुभवतो. या सत्‍संगरूपी भक्‍तीतरंगांत सर्वत्रचे साधक रंगून जात आहेत, हीसुद्धा तुझीच कृपा ! हे माते, भक्‍तीसत्‍संगांच्‍या सप्‍तवर्षपूर्तीनिमित्त आम्‍ही तुझ्‍या चरणी कोटीश: कृतज्ञ आहोत !’

आ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, आपणच साक्षात् आदिपुरुष असल्‍याने आपणच या सर्वांचे मूळही आहात. आपणच आपल्‍या सर्वोत्तम शिष्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या सत्‍संगाचा आम्‍हाला नित्‍य लाभ करून देत आहात, याविषयी आपल्‍या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. वैष्‍णवी वेसणेकर (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय २३ वर्षे) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.