कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील लिंगेश्वर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय चालवणार्या तुळसुली ऐक्यवर्धक संघ या संस्थेच्या बचत खात्यातील २१ लाख ८६ सहस्र ९७२ रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी येथे कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले मुकुंद आत्माराम वारंग यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुळसुली येथील या शैक्षणिक संस्थेमध्ये झालेल्या या अपहाराविषयी कृष्णा केशव वारंग यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. तुळसुली ऐक्यवर्धक संघ संचलित अनुदानप्राप्त खासगी लिंगेश्वर माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेत कार्यरत असलेले मुकुंद वारंग यांनी संस्थेच्या बचत खात्यातील ५ लाख ६९ सहस्र ६६८ रुपये स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतले. त्यानंतर ६ लाख ४४ सहस्र २६६ रुपये धनादेशावर खोट्या स्वाक्षर्या करून स्वत:साठी वापरले. संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ९ लाख ७३ सहस्र २० रुपये एवढ्या रकमेच्या मुदत बंद ठेवीच्या (फिक्स डिपॉझिटच्या) ७ खोट्या पावत्या बनवल्या आणि त्या लेखापरीक्षण अहवालामध्ये खर्या असल्याच्या भासवून ही रक्कमही वापरली. अशी एकूण २१ लाख ८६ सहस्र ९७२ एवढ्या रकमेचा अपहार केला आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.