मुंबई – मोहनदास गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर या दिवशी काँग्रेसकडून भाजपच्या विरोधात ‘मी पण गांधी’ पदयात्रा काढली. पदयात्रा पोलिसांनी अडवल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना कह्यात घेतले.
पदयात्रेसाठी मेट्रो सिनेमा ते गांधीजी यांच्या पुतळ्यापर्यंत अनुमती मागण्यात आली होती. हे शांतताक्षेत्र असल्याने पोलिसांनी अनुमती नाकारून रिगल चित्रपटगृह ते गांधी पुतळा या मार्गाने अनुमती दिली; मात्र पदयात्रा ‘फॅशन स्ट्रीट’च्या मार्गाने गेल्यामुळे पोलिसांनी ती रोखली. कार्यकर्त्यांनी ‘बॅरिकेड्स’ तोडले. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पदयात्रेत समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड प्रसारमाध्यमांशी बोलतांना ‘नथुराम गोडसे यांचे पुजारी गांधीजींचा आवाज दाबू शकत नाहीत’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.