छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे केवळ ३ वर्षांसाठी दिली जाणार !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम यांच्याकडून राज्य सरकारला केवळ ३ वर्षांसाठी दिली जाणार आहेत. या आठवड्यात घोषित केलेल्या सरकारी ठरावात हे नमूद करण्यात आले आहे.

ही वाघनखे नोव्हेंबरमध्ये मुंबईत आणली जातील. ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, तसेच सातारा, नागपूर आणि कोल्हापूर येथील संग्रहालयांत प्रदर्शित केली जाणार आहेत. ही वाघनखे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, नागपूरचे सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूरच्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत. ही वाघनखे लंडनमधून आल्यानंतर देशांतर्गत सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य सरकारने ११ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. वाघनखांचे सार्वजनिकरित्या प्रदर्शन करण्यासंदर्भातील सर्व आराखडे ही समितीच अंतिम करेल.

वाघनखांच्या संदर्भात ब्रिटनच्या म्युझियमशी होणार्‍या कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार ३ ऑक्टोबर या दिवशी ब्रिटनला भेट देणार आहेत. त्या वेळी लंडन येथे असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी होतांना तिथे उपस्थित असतील, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.