कोल्हापूर – शासनाकडून शाळांचे सर्वेक्षण चालू असून त्या संदर्भात दुर्गम भागातील शाळा बंद करण्यात येणार आहेत, अशी आवई उठवणे चुकीचे आहे. राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही. याउलट इंग्रजी शाळांसारखी सुविधा मराठी शाळांमध्ये निर्माण करून मराठी शाळा वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘अंगणवाडी, शिशु गट, वरिष्ठ शिशु गट, पहिली आणि दुसरी अशी ५ वर्षे ‘प्री-प्रायमरी’मध्ये घेतली जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीसाठी माहिती मागवली जात आहे. मराठी शाळांना चांगल्या प्रकारच्या शाळा म्हणून दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अनेक शाळांचे छत नादुरुस्त आहेत, इमारती नादुरुस्त आहेत, सोयीसुविधा नाहीत. सध्या आस्थापनांचा ‘सी.एस्.आर्.’ निधी (व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायीत्व निधी) वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करण्यासाठी वाया जातो. त्यापेक्षा तो शाळांच्या दुरुस्तीसाठी वापरला जाणार आहे.