(म्हणे) ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी आम्ही गंभीर आहोत !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि नरेंद्र मोदी

ओटावा (कॅनडा) – कॅनडा आणि त्याचे सहकारी यांचे भारतासमवेतचे संबंध अधिक दृढ करणे अत्यंत आवश्यक आहे. जगभरातील विविध मंचांवर भारताला महत्त्व दिले जात आहे. भारत एक वाढती आर्थिक शक्ती आहे आणि भू-राजकीय स्वरूपातही तो महत्त्वाचा आहे. आमच्या हिंदी-प्रशांत महासागरातील रणनीतीसाठी भारत महत्त्वाचा आहे. यामुळेच भारताशी संबंध दृढ करण्यासाठी आम्ही गंभीर आहोत, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी माँट्र्रियल येथे एका पत्रकार परिषदेत केले. भारताच्या विरोधात बोलणार्‍या ट्रुडो नरमले असल्याचे यातून दिसून येत आहेत. यामागे भारताने कॅनडाला दिलेले जशास तसे प्रत्युत्तर आणि जागतिक स्तरावर ट्रुडो यांना न मिळालेला पाठिंबा कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

(म्हणे) ‘अमेरिका निज्जर प्रकरणी आमच्या बाजूने !’

ट्रुडो निज्जर हत्येविषयी पुढे म्हणाले, ‘‘आम्हला वाटते की, भारताने आमच्या समवेत काम करावे. सर्व तथ्ये आमच्या समोर आणावीत. अमेरिकेने आम्हाला याविषयी आश्‍वासन दिले आहे की, भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या समोर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन निज्जर हत्येचे सूत्र उपस्थित करतील. अमेरिका आमच्या समवेत आहे आणि ती आमच्या भूमीवर आमच्या नागरिकाच्या हत्येचे प्रकरण उपस्थित करत आहे.’ ट्रुडो यांनी असे म्हटले असले, तरी अमेरिकेत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि अँटनी ब्लिंकन यांच्या भेटीमध्ये निज्जर याच्या हत्येचे सूत्र उपस्थित करण्यात आलेले नाही. यातून ट्रुडो उघडपणे अमेरिकेच्या नावाखाली खोटे बोलत आहेत, असेच जगाला दिसून आले.

संपादकीय भूमिका

  • भारतावर खोटे आरोप करायचे आणि वर अशी भाषा करायची, यातून ट्रुडो भारताला मुर्ख समजतात का ? ट्रुडो यांनी आधी आरोप मागे घेऊन त्यांच्या देशातील खलिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करावी, त्यांना भारताच्या कह्यात द्यावे आणि मगच संबंधांविषयी बोलावे !
  • प्रत्यक्षात अमेरिकेने निज्जर प्रकरण भारतापुढे उपस्थित करण्याचे टाळले, ही वस्तूस्थिती असून यातून कॅनडा उघडा पडला आहे, हे स्पष्ट होते !