माजी नगरसेवकासह चार जणांना अटक
सातारा, २९ सप्टेंबर (वार्ता.) – महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. सातारा, महाबळेश्वर आणि मेढा वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत ६ कोटी ५ लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी शासनाधीन करण्यात आली आहे. या प्रकरणी महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह रत्नागिरी येथील संतोष जैन, मेढा येथील संजय सुर्वे आणि जावली येथील अर्जुन ओंबळे यांना अटक करण्यात आली आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार माचुतर येथे धाड टाकून व्हेल माशाची उलटी कह्यात घेण्यात आली. या व्हेल माशाच्या उलटीचे वजन ६.५ किलो आहे. व्हेल माशाच्या उलटीला ‘अंबरग्रीस’ किंवा तरंगणारे सोने असेही म्हणतात. ही एक दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू आहे. तिचा उपयोग अत्तर, औषधे आणि इतर अनेक उत्पादने यांमध्ये केला जातो.