खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या ५० ठिकाणी धाडी !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांच्या विरोधात कारवाई करतांना देशातील ५ राज्यांतील ५० हून अधिक ठिकाणी धाडी घातल्या. राजधानी देहली, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांत या धाडी घालण्यात आल्या. पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये अनेक कुख्यात गुंडांनी आश्रय घेतला असून त्यांचा संबंध खलिस्तानी आतंकवाद्यांशी असल्याचे सांगितले जात आहे. खलिस्तानी आतंकवादी गुंडांना पैसे देऊन कारवाया करून घेत आहेत. यासाठी खलिस्तान्यांना पैशांची आवश्यकता आहे. हा पैसा पाकिस्तानातून अमली पदार्थ तस्करी करून मिळवला जातो.

खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुरावे सापडले आहेत. पाकिस्तान खलिस्तानी आणि गुंड यांना अर्थपुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे. पाक भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासमवेतच आतंकवादीही पाठवत आहे. या कामासाठी इस्लामी आतंकवाद्यांऐवजी खलिस्तानी आतंकवाद्यांचे साहाय्य घेतले जात आहे. कॅनडातील  खलिस्तानी आतंकवादी आय.एस्.आय.च्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे.