६ ऑक्टोबरपर्यंत ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ जागे होण्याची प्रतीक्षा करू ! – इस्रो

बेंगळुरू (कर्नाटक) – चंद्रयान-३चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवार उतरल्यानंतर १४ दिवस त्यांनी तेथील माहिती पाठवली. १४ दिवसांनी तेथे त्यापुढील १४ दिवसांसाठी सूर्य मावळल्याने अंधार झाला. या काळात येथे प्रचंड थंडी असते. त्यामुळे ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ यांचे काम इस्रोकडून बंद करण्यात आले होते. आता २२ सप्टेंबर या दिवशी येथे पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर या दोघांचे काम पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न इस्रोकडून केला जात आहे; मात्र त्याला अद्यापही यश आलेले नाही. याविषयी इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ म्हणाले की, विक्रमकडून अद्याप कोणताही ‘सिग्नल’ मिळालेला नाही; पण ‘तो मिळणारच नाही’, असे सांगू शकत नाही; म्हणून आपण ६ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करू. कारण तोपर्यंत सूर्य तळपत राहील, तापमान वाढेल आणि आशाही कायम रहातील. तापमान वाढल्याने यंत्रणा गरम होण्याची शक्यता आहे. हे कधी होईल ?, हे सांगणे मात्र कठीण आहे. ‘ऑर्बिटर’च्या माध्यमातून विक्रमला सतत ‘सिग्नल’ पाठवले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.