पुणे येथे भाविकांच्‍या सोयीसाठी लोकसहभागातून २०० स्‍वच्‍छतागृहे; गरोदर महिलांना आरामासाठी ३ ‘व्‍हॅनिटी व्‍हॅन’ !

पुणे – गणेशोत्‍सवाच्‍या वेळी भाविकांची असुविधा टाळण्‍यासाठी लोकसहभागातून २०० स्‍वच्‍छतागृहांची सुविधा उपलब्‍ध करून दिली जाणार आहे, तसेच गरोदर महिलांना आरामासाठी ३ ‘व्‍हॅनिटी व्‍हॅन’ (सर्व सोयींनी युक्‍त गाडी) स्‍वरूपात हिरकणी कक्ष, पोलीस आणि महापालिका कर्मचार्‍यांसाठी विनामूल्‍य भोजन व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. गणेशोत्‍सवाचे शेवटचे ३ दिवस आणि अनंत चतुर्दशीला ही व्‍यवस्‍था पुणे शहरातील गर्दीच्‍या ठिकाणी करण्‍यात येईल. पालकमंत्री, राज्‍याचे उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही सुविधा देण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे.

देशभरातील भाविकांचे पुण्‍याचा गणेशोत्‍सव प्रमुख आकर्षण आहे. शहरातील गणेशोत्‍सव मंडळांची सजावट, देखावे पहाण्‍यासाठी अन्‍य शहरांतून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. या कालावधीत शहरातील अपुर्‍या स्‍वच्‍छतागृहांमुळे नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी अडचण होते. या वेळी या सुविधेमुळे श्री गणेशभक्‍तांची असुविधा होणार नसून उत्‍सवाचा आनंद सहज लुटता येईल, असे पाटील यांनी सांगितले.