संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्‍याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना ! – आमदार नीतेश राणे

विधानसभा अध्‍यक्षांच्‍या संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण !

आमदार नीतेश राणे

मुंबई – राज्यघटना, कायदा आणि विधीमंडळ यांच्याशी बेईमानी करून वेळकाढूपणा चाललाय. घटनात्‍मक पदावर बसलेले विधानसभा अध्‍यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवत आहेत काय ? ‘आम्‍ही करू ते खरे अशी बादशाही विधानसभा अध्‍यक्ष करत असतील, तर ती बादशाही बुडाल्‍याविना रहाणार नाही’, ‘विधानसभा अध्‍यक्ष फुटले आहेत’, अशी वक्तव्‍ये राज्यसभा सदस्‍य श्री. संजय राऊत यांनी विधानसभा अध्‍यक्षांच्‍या संदर्भात केली आहेत. तसेच ‘उशिरा न्‍याय देणे हासुद्धा अन्‍याय असतो आणि तो अन्‍याय विधानसभा अध्‍यक्ष करीत आहेत’, असे वक्तव्‍य विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते श्री. अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्‍यक्षांच्‍या संदर्भात केले. अशा प्रकारचे स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. यामुळे लोकशाहीच्या हितासाठी उपरोक्त दोन्‍ही व्‍यक्तींच्या अशा बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध योग्‍य ती कारवाई करण्‍यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्‍काळ सुपुर्द करावे, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी केली आहे.