अंतिम संमतीसाठी केंद्रशासनाकडे सादर
पिंपरी (पुणे) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा ५७७ कोटी १६ लाख रुपयांचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यास पर्यावरण विभागाने स्वीकारून केंद्रशासनाच्या संमतीसाठी पाठवला आहे.
इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील एकूण ५४ गावे आणि शहरांतून निघणारे सांडपाणी, तसेच औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्त सांडपाणी, तसेच मैला यांमुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे ‘इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ५४ गावांतील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. नदीपात्र स्वच्छ करणे, शुद्धीकरणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, नदी काठावर मुख्य ठिकाणी ‘रिव्हरफ्रंट्स’ विकसित करणे, बृहद आराखडा (मास्टर प्लॅन) आणि सविस्तर प्रकल्प अहवाल सिद्ध करणे आदी कार्यवाही या प्रकल्पाच्या माध्यमातून केली जाणार आहे.