सुधारणावाद्यांनी ‘हिंदु धर्म स्‍त्रीविरोधी आहे’, असे म्‍हणणे, म्‍हणजे स्‍वतःचे घोर अज्ञान प्रदर्शित करणे होय !

दैनिक ‘लोकसत्ता’च्‍या १६ सप्‍टेंबर या दिवशीच्‍या अंकात ‘सनातनी (धर्म) संकट !’ या मथळ्‍याखाली प्रसिद्ध झालेल्‍या अग्रलेखात सनातन धर्मावर टीका करून त्‍यात सनातन धर्म हा ‘स्‍त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्‍यवस्‍था मानणारा’ असे चित्र रंगवण्‍यात आले आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्‍याचे खंडण येथे देत आहोत.

(टीप : ‘लोकसत्ता’च्‍या अग्रलेखातील भाषा आणि व्‍याकरण यात पालट न करता तसेच ठेवण्‍यात आले आहे.)

आक्षेप

स्‍त्रीशिक्षण, विधवाविवाह यासारख्‍या अनेक सामाजिक सुधारणांना सनातन्‍यांचा प्रखर विरोध होता. स्‍त्रिया शिकल्‍या तर धर्म बुडेल या विचारांनी सावित्रीबाई फुले यांच्‍यावर शेण फेकले गेले, त्‍यांना दगड मारले गेले ते याच विचारांमधून.

खंडण

हिंदु स्‍त्रियांनी दाखवलेली विद्वत्ता आणि गाजवलेला पराक्रम यांचा मोठा इतिहास !

१. समाजातील एका घटकाने स्‍त्रीशिक्षण, विधवाविवाह यांना विरोध केला, तर त्‍याचे खापर संपूर्ण समाजावर कसे फोडता येईल ? ‘आतंकवादी एकाच धर्माचे असतात’, अशी टीका होऊ लागल्‍यावर निधर्मीवादी चवताळून उठतात आणि ‘समाजातील काही लोकांनी असे कृत्‍य केल्‍यास त्‍याचा दोष मुसलमान समाजाला देता येत नाही’, असा प्रतिवाद करतात. मग हाच नियम हिंदु समाजाला लागू का होत नाही ?

२. जेव्‍हा ‘हिंदु धर्मात स्‍त्रीसमानता किंवा स्‍त्रीशिक्षण होते का ?’, हे सूत्र येते, तेव्‍हा गार्गी आणि मैत्रेयी या २ विदुषींचा उल्लेख सर्वत्र आढळतोच; मात्र आणखी इतिहास चाळला, तर हिंदु स्‍त्रियांनी गाजवलेल्‍या शौर्याचा उल्लेख पदोपदी आढळतो. रामायणाचा कालावधी ५ लाख वर्षांपूर्वीचा आहे. रामायणात राजा दशरथासमवेत कैकयीने युद्धात सहभागी झाल्‍याचा आणि त्‍याचे प्राण वाचवल्‍याचा उल्लेख आहे. अलीकडच्‍या काळात राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई आदींही पराक्रम केल्‍याचे आपल्‍याला ठाऊक आहे. आद्यशंकराचार्य आणि मंडणमिश्रा यांच्‍यात जो वादविवाद झाला, त्‍या वेळी मंडणमिश्रा यांची पत्नी भारती यांनी परीक्षक म्‍हणून काम पाहिले. यातून त्‍यांच्‍या विद्वत्तेचा आपल्‍याला अंदाज येऊ शकतो. अशी अनेक उदाहरणे येथे देता येतील.

विधवाविवाहांचा रामायणातील उल्लेख !

१. रावणाला ठार मारल्‍यानंतर प्रभु श्रीरामाने लंका बिभिषणाला सोपवली. श्रीलंकेचा राज्‍यकारभार हातात घेतल्‍यानंतर बिभीषणाने रावणाची पत्नी मंदोदरी हिच्‍याशी विवाह केला. मंदोदरीशी विवाह करण्‍याचा प्रस्‍ताव प्रभु श्रीरामाने ठेवल्‍याचा उल्लेख आढळतो.

२. वालीच्‍या वधानंतर त्‍याची पत्नी ताराचा विवाह सुग्रीवशी झाल्‍याचा उल्लेख रामायणात आढळतो.

हिंदु धर्मात विधवांनी पुनर्विवाह करण्‍याला आडकाठी नाही, यासाठी ही २ उदाहरणे पुरेशी आहेत.

स्‍त्री शिक्षण आणि स्‍त्रीचा उद्धार यांची उज्‍ज्‍वल परंपरा हिंदु धर्मात असतांना ‘हिंदु धर्म स्‍त्रीविरोधी आहे’, असे म्‍हणणे हे स्‍वतःचे घोर अज्ञान प्रदर्शित करणे होय !

(क्रमशः)

– एक धर्मप्रेमी, गोवा